औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी

by Team Satara Today | published on : 03 March 2025


मुंबई : विकी कौशलच्या छावा चित्रपटामुळे औरंगजेबाचं पात्र सध्या चांगलंच चर्चेत आहे. औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाही चांगलाच ट्रोल होत आहे. दरम्यान अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

मुघल सम्राट औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा म्हणजेच आताचा म्यानमारपर्यंत पसरली होती. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हटलं जात असे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं उभारली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती, असं अबू आझमी यांनी सांगितलं. यावेळी अबू आझमी यांना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची ज्याप्रकारे हत्या केली, ती योग्य होती का, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अबू आझमी उत्तर न देता निघून गेले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी याबाबत भाष्य केलं आहे. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचं आहे. उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे, असं राम कदम यांनी म्हटले. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवलं, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.

करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्याविरोधात युट्यूब चॅनल मध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. ते वारंवार ब्राह्मण आणि राजपूत यांच्याविरोधात वक्तव्यं करतात. विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर समाजात दुही माजवली जात असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार करनी सेनेने पोलिसांत दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेला भारत लष्करी शक्तीत महाकाय
पुढील बातमी
एसटीला प्रयागराज फेऱ्यातून २० लाखांहून अधिक उत्पन्न

संबंधित बातम्या