एकंबेच्या दत्तात्रय चव्हाण यांची मुंबई लोक आयुक्त कार्यालयात सहाय्यक प्रबंधकपदी पदोन्नती; एकंबे ग्रामस्थांनी केला सत्कार

by Team Satara Today | published on : 02 March 2026


सातारा : मुंबई येथील महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कार्यालय येथे सहाय्यक प्रबंधक या पदावर दत्तात्रय निवृत्ती चव्हाण यांना पदोन्नती मिळाली आहे. यापूर्वी ते मुंबईतच लोक आयुक्त कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. मूळचे एकंबे, ता. कोरेगाव येथील रहिवासी असलेल्या चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे एकंबे गावासह कोरेगाव तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.

दत्तात्रय चव्हाण यांच्या या यशाबद्दल एकंबे ग्रामस्थांच्यावतीने रविवारी सकाळी त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी उपसरपंच श्रुतीन चव्हाण व मित्रमंडळाच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात प्रगतीशील शेतकरी व माजी सैनिक गणपत चव्हाण, अशोक ननावरे, कुमार चव्हाण, गोरख ननावरे, चंद्रकांत चव्हाण, सुरज चव्हाण, किरण चव्हाण, शंभूराज चव्हाण महेश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्रुतीन चव्हाण यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, दत्तात्रय चव्हाण हे आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि राज्यभरात एकंबे गावाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास आहे.

सत्कारा उत्तर देताना दत्तात्रय चव्हाण म्हणाले, श्रुतीन चव्हाण मित्र परिवार व ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानामुळे काम करण्यास अधिक बळ मिळाले आहे. आपल्या हातून सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे व त्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयातील प्रबंधक अशोक जाधव, अतिरिक्त प्रबंधक श्रीमती पालवणकर तसेच पूर्वीच्या सहाय्यक प्रबंधक श्रीमती निशा तरे व कक्ष अधिकारी शैलेश नाईक यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोक आयुक्त कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जनतेच्या हिताचे काम करण्याचा शब्द त्यांनी दिला.

प्रारंभी हरिभक्त परायण वेदांत महाराज घाडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रुतीन चव्हाण यांनी आभार मानले. दत्तात्रय चव्हाण यांच्या पदोन्नतीमुळे एकंबे गावात आनंदाचे वातावरण आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गीत गायनाने समता वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! रमिजा सय्यद, विलास जावळे, शेखर कांबळे, यशेंद्र क्षीरसागर यांनी सादर केली गाणी
पुढील बातमी
भादे येथील गायकवाड मळा शिवारात गांजाची लागवड करणारा जेरबंद : 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या