हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित; आता बास झालं, नाहीतर आम्हाला सुद्धा कायदेशीर पावलं उचलावी लागतील; उद्धव ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणी इशारा

by Team Satara Today | published on : 17 September 2026


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सीबीआयने याप्रकरणी नुकताच एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे यासंदर्भात आधीपासूनच सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता अधिक धार चढली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणातील एफआयआरमध्ये आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव नाही. दिशाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या संदर्भाने घेतलेली नावे हा केवळ प्रक्रियात्मक तपशील आहे. या साऱ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे यांनी आज रोखठोक भाष्य केले.
"या प्रकरणात आता माझं नाव आलं आहे, उद्या तुमचंही नाव येऊ शकतं आणि हे मी खूप गंभीर्याने बोलत आहे. ज्या प्रकरणाशी आमचा दूरवर काहीही संबंध नाही, ज्यांची आणि आमची ओळखपाळखही नाही अशा ठिकाणी आमचे नाव गोवण्यात आले आहे. हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे. आम्ही आत्तापर्यंत गप्प होतो. तुम्हाला ज्यांची चौकशी करायची असेल, त्यांची चौकशी करा; पण फालतू चारित्र्यहनन करू नका. आता हे बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावलं उचलावी लागतील," असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनीही याबाबत एक्स पोस्ट केली आहे. "अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कँपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील," असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ध्वनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यात हयगय झाल्यास न्यायालयात खटला दाखल करू; सजग वाईकर नागरिकांनी थेट पोलिसांनाच बजावली कायदेशीर नोटीस
पुढील बातमी
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची आदित्य ठाकरे यांना तब्बल ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही नोटीस

संबंधित बातम्या