राजस्थान : राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली. कामगारांना घेऊन जाणारी बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली. या घटनेत दहा कामगार भाजले आहेत, तर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी जयपूर ग्रामीण भागातील मनोहरपूरजवळ घडली.
बसमधून वीज प्रवाह गेल्याने संपूर्ण बसला आग लागली. आगीत सुमारे १० कामगार गंभीररित्या भाजले, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर पाच जण गंभीर असून त्यांना जयपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
कामगारांना घेऊन जाणारी बस उत्तर प्रदेशातील मनोहरपूर येथील तोडी येथील वीटभट्टीकडे जात होती. वाटेतच हा अपघात झाला. ११,००० व्होल्टच्या हायटेन्शन वायरच्या संपर्कात येताच बसने पेट घेतला.
अपघाताची माहिती मिळताच मनोहरपूर पोलिस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने शाहपुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी कामगारांना जयपूर येथे दाखल केले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.