सातारा : आजच्या भरकटलेल्या समाज व्यवस्थेला दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक विचार देणाऱ्या त्रीमुर्ती म्हणजे क्रांतीवीर म. फुले, राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाजजागृतीचे अढळ दीपस्तंभच आहेत. आज आपण एका अत्यंत क्रांतीकारक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार आहोत.कारण आपण साजरी करीत आहोत. महात्मा फुले यांची २०० वी जयंती,गाडगेबाबांची १५० वी जयंती,आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी. हे आकडे केवळ संख्या नाहीत तर हीआजच्या आपल्या पुसट होत चाललेल्या इतिहास आणि संस्कृतीची न मिटवता येणारी पदचिन्हे आहेत.या युगपुरुषांच्या विचारांचा जागर म्हणजे समाजाला जागवणाऱ्या क्रांतीकारी स्मृतींची आराधना आहे. या महामानवांचे विचार व कार्य म्हणजे समता,स्वातंत्र्य आणि मानव सेवेची अखंड तेवती मशालच आहे, अशा भावपूर्ण शब्दांत जेष्ठ विचारवंत प्रा.श्रीधर साळुंखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ, शाहूपुरी, संस्कार वर्ग - शाहूपुरी माध्यमिक विद्यालय, कट्टा ग्रुप शाहूपुरी व शाहूपुरी गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष, संत गाडगे बाबा १५० वी जयंती वर्ष, महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित 'चला करुया जागर महापुरुषांच्या विचारांचा' या वर्षभर चालणा-या उपक्रमाचे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, शालाप्रमुख पी. के. दीक्षित, संकेत परामणे, सौरभ पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपदेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.
प्रा.साळुंखे यांनी पुढे बोलताना हा उपक्रम ही काळाची गरज असून अनेक रंगात दुभागलेला समाज आणि दुभंगलेली मने सांधण्याकरीता झालेली ही सुरुवात, यांतील युवापिढीचा उस्फूर्त सहभाग भविष्यात नक्कीच आदर्श नवपिढी घडविण्यास उपयुक्त ठरेल व यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी भारत भोसले, प्रतिथयश उद्योजक राजेंद्रकुमार मोहिते यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचा हेतू विशद केला. प्रारंभी कट्टा ग्रुपचे सौरभ पाटणे यांनी प्रास्ताविकाद्वारे चुकीच्या संकल्पनांद्वारे महापुरुष सुद्धा जातीपातीत विभागले गेले असून ही बाब समाजासाठी हितावह नसल्यानेच महापुरुष हे सर्व समाजाचे असतात हा संदेश देण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगीतले.
एस. एम. बारंगळे यांनी अतिथींचा परिचय करून दिला तर एम. आर. जाधव यांनी स्वागत केले. नवपिढीच्या वतीने अक्षरा मोहिकर या विद्यार्थिनीने या उपक्रमांतून मिळालेला संस्कार आम्ही आयुष्यभर जपून ठेवू असे सांगीतले. शाहूपुरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चेतन खराडे यांनी आभार मानले. चंद्रकांत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास प्रा. डाॅ. सुजित जाधव, भाऊसाहेब पाटणे, संजय क्षीरसागर, निवृत्त सुभेदार ज्ञानदेव मोरे, प्रशांत कांबळे, सुरेश पांढरपट्टे, जनार्दन घाडगे गुरुजी, रघुनाथराव बाबर, नेताजी कुंभारे, हणमंतराव पवार, श्रीकांत पंडीत, सुरेश शेटे,महेश जांभळे, दिलीप काकडे, अजय भोसले, गिरीष सकुंडे, संजय माने, हणमंतराव धुमाळ, मनोहर महामुनी, नंदकुमार जाधव, स्वप्नील उबाळे, भानुदास गायकवाड, सादीक आतार, सिद्धार्थ गायकवाड व विद्यार्थी,पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.