खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याचीही लवकरच चाचणी; पुणे-सातारा मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित व जलद होणार

by Team Satara Today | published on : 30 April 2026


खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात असलेला पहिला बोगदा विनाव्यत्य सुरू आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या बोगद्यातूनच वाहतूक सुसाट सुरू असताना आता दुसरा बोगदाही प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहेत. लवकरच दुसऱ्या बोगद्याची चाचणी होणार असल्याची माहिती एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बोगद्यामुळे पुणे-सातारा मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित व जलद होणार आहे.

महामार्गावर पुणे बाजूकडे जाताना वेळे गावाच्या पुढे खंबाटकी बोगदा आहे. जुना बोगदा अरूंद असल्याने व एस वळण बायपास करण्यासाठी नवीन बोगद्याची निर्मिती होत आहे. दुसरा बोगदाही जूनच्या आसपास खुला होईल, असे सांगण्यात येत होते. सध्या दुसऱ्या बोगद्याचे काम 86 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे निर्धारित डेडलाईनपूर्वीच म्हणजे मे महिन्यात केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

हा बोगदा खुला झाल्यानंतर खंबाटकी घाटातील धोकादायक अवघड वळणे, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांच्या नुकसानीपासून प्रवाशांची सुटका होईल. नवीन बोगद्यातील सहापदरी रस्त्यामुळे पुणे-सातारा मार्गावरील किमान अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे. नव्या बोगद्यात सुधारित प्रकाशयोजना, सीसीटीव्ही निगराणी, रुंद मार्गिका, परावर्तक आणि स्पष्टपणे चिन्हांकित आपत्कालीन प्रणाली यांसारख्या सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. जुन्या बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा अधिक रुंद असल्याचेही एनएचएआयकडून सांगण्यात आले. पुणे-सातारा दरम्यान या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. जुना बोगदा पार करायला 15 ते 20 मिनिटे लागायची. आता नवीन बोगदा फक्त 5 ते 7 मिनिटांत पार करता येणार आहे.

खंबाटकी घाट हा मुंबई-पुणे-बंगळूर कॉरिडॉरमधील महत्त्वाचा दुवा आहे. तो सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांना जोडतो. तसेच पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, इत्यादी पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या हजारो पर्यटक आणि सज्जनगड, मांढरदेव, गोंदवले येथे जाणाऱ्या भाविकांसाठी खंबाटकी घाट महत्त्वाचा मार्ग आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा क्रीडाधिकारी तारळकर निलंबित; सोलापूर व सातारा येथील जलतरण तलावातील भ्रष्टाचाराचा ठपका
पुढील बातमी
जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया मुक्ती संकल्प सप्ताह; एक ते आठ मेदरम्यान जागृती, तपासणी, प्रशिक्षण, समुपदेशन

संबंधित बातम्या