शेळकेवाडीत बैलगाडा शर्यतीच्या स्टेटसवरून जुना वाद उफाळला; एकावर जीवघेणा हल्ला, ५ जण जखमी

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा : व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर बैलगाडा शर्यतीच्या बैलाचे स्टेटस ठेवण्याच्या गैरसमजातून सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या जीवघेण्या हल्ल्यात एकूण पाच जण जखमी झाले असून, यापैकी प्रवीण शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर चार जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तातडीने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

​याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेळकेवाडी येथील प्रसाद रत्नाकर शेळके यांच्याकडे एक पळणारे खोंड होते. त्यांनी ते खोंड पुण्यातील एका बैलगाडा शर्यत व्यवसायिकाला विकले होते. लहानपणापासून या खोंडाचा सांभाळ व संगोपन केल्यामुळे प्रसाद शेळके यांना त्याचा विशेष लळा होता. पुणे परिसरात या बैलाने एखादी शर्यत जिंकली की प्रसाद शेळके अभिमानाने त्या बैलाचे स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवत असत. दरम्यान, गावातीलच अमोल बाळकृष्ण कदम हे देखील बैलगाडा शर्यत व्यवसायिक आहेत. परंतु, त्यांची बैलजोडी मैदानात फारशी जिंकत नसल्यामुळे, प्रसाद शेळके हे आपल्याला खिजवण्यासाठी आणि चिडवण्यासाठीच मुद्दाम त्या विकलेल्या बैलाचे स्टेटस ठेवत आहेत, असा अमोल कदम यांचा गैरसमज झाला.

​याच गैरसमजातून दोन्ही बाजूने व्हाट्सॲप आणि इंस्टाग्रामवर कमेंट युद्ध रंगले होते आणि त्यांच्यात समोरासमोर खुन्नसबाजी सुरू झाली होती. त्यावेळी मध्यस्थांनी मध्यस्थी करून 'असा कोणताही हेतू नाही' असे सांगत आपापसातील वाद मिटवला होता. मात्र, मनात धुमसत असलेल्या याच वादातून ३० आणि ३१ मे रोजी गावात पुन्हा धुसफूस सुरू झाली. या वादाचे पर्यवसान सोमवारी (दि. १ जून) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संघर्षात झाले.

​गावातील ग्रामपंचायत आणि विठ्ठल मंदिराजवळ दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात जोरदार वाद उफाळला. 'आता कोणाला जिवंत सोडायचे नाही' असे म्हणत लाकडी दांडकी, दगड आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रवीण शेळके गंभीररीत्या जखमी झाले. प्रसाद रत्नाकर शेळके यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाळकृष्ण कदम, वैभव हिम्मत आढाव, रोहित राजेंद्र आढाव, आकाश संदीप उर्फ संजय शेळके, प्रतीक विजय शेळके, साहिल नवनाथ शेळके, रवींद्र सुरेश शेळके आणि सुरेश मारुती शेळके यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​गुन्हा दाखल होताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी तत्परता दाखवत आठ संशयितांपैकी एकाला तातडीने ताब्यात घेतले आहे. अन्य एक संशयित जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत असून, फरार झालेल्या उर्वरित सहा जणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील करत आहेत. शेळकेवाडी गावात यापूर्वीही किरकोळ कारणावरून वाद होण्याची परंपरा राहिली असून, या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत
पुढील बातमी
कॉलेजचे ॲडमिशन घेऊन परतणाऱ्या दोघांवर काळाचा घाला; सारोळा महामार्गावर भीषण अपघात, तीन दिवसांपूर्वीच घेतली होती नवीन दुचाकी

संबंधित बातम्या