बारावीची परीक्षा उत्साहात सुरू; यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

by Team Satara Today | published on : 11 February 2026


 सातारा  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवारपासून (१० फेब्रुवारी) इंग्रजी पेपरने उत्साहात सुरू झाली असून, या परीक्षेला १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. कोल्हापूर विभागातून ३ लाख ५२ हजार ७१८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सातारा येथील अग्रगण्य यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (केंद्र क्रमांक ००२३) या परीक्षा केंद्रावर एकूण २०४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. तब्बल ८२ दालनांत बैठक व्यवस्था करण्यात आली असून परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरणात शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सर्व परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, उपप्राचार्य एन. टी. निकम, पर्यवेक्षिका व्ही. एम. वाळवेकर आणि केंद्र संचालक एन. ए. पाटील यांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली. सकाळी लवकरच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती. परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त व्हावी यासाठी परीक्षा केंद्रावर शिस्तबद्ध आणि प्रोत्साहनपर वातावरण ठेवण्यात आले होते. या केंद्रावर काॅपीमुक्त अभियानांतर्गत कडेकोट उपायोजना राबविण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

यावेळी गुरुकुल विभागप्रमुख प्रा. आर. आर. खोत, प्रा. विजयकुमार मोहिते, प्रा. सचिन गोरे, प्रा. हनुमंत खाटमोडे, प्रा. आसिफ तांबोळी, प्रा. ज्ञानेश्वर डोके, प्रा. एस. बी. खिलारे, प्रा. विवेक पवार,  क्रीडा शिक्षक प्रा. अमोल जमदाडे, प्रा. हणमंत शिंदे, जितेंद्र पवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख, दक्षता कमिटीतील सर्व सदस्य आणि प्राध्यापकांनी प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांची तपासणी करून केंद्रामध्ये प्रवेश दिला. महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने परीक्षेसाठी कडेकोट नियोजन करण्यात आले असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ९ भरारी पथके आणि पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आपल्या कॉलेजमधील प्राचार्य, उपप्राचार्य आणि शिक्षकांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या आज निवडी; भाजप देणार नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी
पुढील बातमी
ईपीएस पेन्शनधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; किमान ९००० पेन्शन देण्याची एकमुखी मागणी

संबंधित बातम्या