अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 18 December 2025


सातारा  : अल्पसंख्यांक समाजाच्या उन्न्तीसाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना व धोरणे राबविण्यात येत आहेत. संबंधित विभागांनी योजना व धोरणांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन अल्पसंख्यांकांच्या उन्नती व जीवनमान उंचविण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुभाष वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, उपपोलीस अधीक्षक अतुल सबणीस, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने त्यांच्याकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाबरोबर अल्पसंख्यांक नागरिकांना उद्योगांसाठी  कर्ज पुरवठा करावा. पोलीस विभागाकडे अल्पसंख्यांकांकडून विविध गुन्हे दाखल होतात याचा अभ्यास करुन कोणत्या स्वरुपाचे गुन्हे दाखल होत आहेत याची माहिती पुढील बैठकीत द्यावी.

अल्पसंख्यांक भागाचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी येतो. या निधीतून करण्यात आलेल्या कामांचे छायाचित्रे सादर करावीत व कामामुळे अल्पसंख्यांक नागरिकांना झालेला लाभ याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी. राज्य घटनेने स्वतंत्र जगण्याचा अधिकारोबरोबरच योजना व धोरणे आखाली असून यातून सर्व समाजाला प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्यांकाच्या कल्याणाकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ द्यावा. त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचाही वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

तालुकास्तरीय शांतता कमिटीच्या वेळोवेळी बैठकाही घ्याव्यात, असे सांगून अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी अल्पसंख्यांकांच्या कल्याणाकरिता नवीन 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. थोरात यांनी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची माहिती दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ; उद्दिष्टापेक्षा जास्त संकलनाबद्दल जिल्हाधिकारी पाटील व सैनिक कल्याण अधिकारी हांगे यांचा सत्कार
पुढील बातमी
खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

संबंधित बातम्या