सातारा : सातारच्या चित्राणी नवले हिने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या जागतिक दर्जाच्या लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या स्पर्धेत ८९ किलोमीटर अंतर सलग १३ तास ७ मिनिटांत पार करून सुवर्णपदक मिळवले आहे. ती ही कामगिरी करणारी महाराष्ट्रातील पहिली आणि सर्वात तरुण जलतरणपटू ठरली आहे. एक तास नव्हे दोन तास नव्हे तर तब्बल १३ तास ०७ मिनिटे ती पोहोत राहिली. न थकता सलग पोहून तिनं तब्बल ८१ किलोमीटरचं अंतर पार केलं. ही कामगिरी केली.
पश्चिम बंगालमधील बेरहामपूर, जिल्हा मुर्शिदाबाद येथे मुर्शिदाबाद जिल्हा स्विमिंग असोसिएशन यांच्या वतीने जगातील सर्वात लांब आणि ऐतिहासिक ८० व्या राष्ट्रीय गंगा भागीरथी नदी (गोड्या पाण्यातील) जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये साताऱ्याच्या के. शामराव डी. शानभाग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेतील १६ वर्षीय विद्यार्थिनी चित्राणी मुकुंद नवले हिने यश संपादन केले आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केले.
देशभरातून व परदेशातून २७ नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या स्पर्धकांची संख्या विशेष उल्लेखनीय होती. चित्राणी हिने यापूर्वीही अनेक लांब पल्ल्याच्या स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. यात समुद्रातील खाऱ्या पाण्यातील विजयदुर्ग येथे ३० किलोमीटर, मालवण येथे दहा किलोमीटर व ३ किलोमीटर, तसेच मुंबई येथील ५ किलोमीटर अशा विविध स्पर्धांमध्ये तिने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. सध्या ती सातारा येथील शानभाग स्कूलच्या जलतरण तलावात नियमितपणे सराव करते.
यशाबद्दल संस्थापक रमेश शानभाग, विश्वस्त उषा शानभाग, संकेत शानभाग, प्राचार्य अभिजीत मगर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा भिसे, जलतरण प्रशिक्षक महेश काटे, जलतरण प्रशिक्षक रवी नाटेकर, सुधीर चोरगे, क्रीडा प्रमुख अमित उघाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
रोज आठ तास सराव
चित्राणीचे गाव सातारा तालुक्यातील वाढे आहे. ती दररोज सरासरी सात ते आठ तास सराव करते. यासाठी आठवड्याचे वेळापत्रकच तयार केले आहे. दररोज सराव वाढवत असते. यामध्ये सकाळी सहापासून रनिंग, वर्कआऊट, तीन तास पोहणे, दुपारी साडेतीन अन् व सायंकाळी सहानंतर पुन्हा एक-दोन तास पोहत असते. स्पर्धा जवळ आल्यानंतर हा सराव आणखी वाढविला जातो. यासाठी केएसडी शानभाग विद्यालयाने जलतरण तलाव तसेच जीम उपलब्ध करून दिली आहे. तिचे वडील मुकुंद नवले हे खासगी अकाउंटंट म्हणून काम पाहतात.
सलग १३ तास ७ मिनिटे पोहून पार केलं ८९ किलोमीटर अंतर; सातारच्या चित्राणी नवले हिची मुर्शिदाबाद येथील स्पर्धेत कामगिरी
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा