सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना जी ऐतिहासिक वाघनखे वापरली होती ती वाघनखे लंडनहून भारतात आणल्यानंतर गतवर्षातील १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली आहेत. या वाघनखांचा कालावधी येत्या ३१ जानेवारीला पूर्ण होत असून, एक फेब्रुवारीला ही वाघनखे नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयात पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.
त्यामुळे साताऱ्यातील संग्रहालयात वाघनखांचा मुक्काम केवळ एक महिना राहिल्याने वाघनखे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत सुमारे तीन लाख पर्यटकांनी शिवरायांच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी संग्रहालयास भेट दिली आहे.
शिवरायांच्या जाज्वली इतिहासाची आणि शौर्याची साक्ष देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील वाघनखे व अन्य ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहेत.
राज्य शासनाने प्रयत्न करून लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम येथून सात महिन्यांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात १९ जुलैला वाघनखे आणण्यात आली. या संग्रहालयातील वाघनखांचे दालन, तख्त, शस्त्र, नाणी, ढाली, तलवारी, भाला, दांडपट्टा यासह शिवकालीन १७ व १८ व्या शतकातील शस्त्रास्त्रे व अन्य ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
ही वाघनखे व अन्य वस्तू पाहण्यासाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. सोमवारी संग्रहालय बंद ठेवले जात असून, दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिवप्रेमींना संग्रहालय खुले ठेवले जाते. शिवरायांच्या काळातील महत्त्वाचा ठेवा असणारा वाघनखे आता केवळ महिनाभर असून, जास्तीत-जास्त नागरिकांनी वाघनखे पाहण्यासाठी यावे, असे आवाहन संग्रहालयाच्या वतीने करण्यात आले आहे.