राजकारण करू नका. मोदी सरकार दोषींना सोडणार नाही - उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, दरे तर्फ तांब येथे पत्रकारांशी संवाद

by Team Satara Today | published on : 23 July 2026


दरे तर्फ तांब : नीट परीक्षा पेपरफुटी ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित दुर्दैवी घटना आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश योग्य असला, तरी काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत, ही बाब गंभीर आहे. नीट पेपर फुटीवर राजकारण करू नका. मोदी सरकार दोषींना सोडणार नाही, असा विश्‍वास उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त केला.

शिंदे यांनी दरे तर्फ तांब येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, एनडीएच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली असून, विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. या गैरप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भारताचा युवा हा देशाची सर्वात मोठी ताकद असून, त्याला सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

पंतप्रधानांच्या अतिसंवेदनशील निवासस्थानासमोर आंदोलनासाठी लोकांना आवाहन करणे हे बेजबाबदारपणाचे आहे. देशाने यापूर्वी दोन पंतप्रधान गमावले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचे निवासस्थान हे देशातील सर्वाधिक सुरक्षा असलेले ठिकाण आहे. तेथे मोठ्या प्रमाणात जमाव जमवून आंदोलन करण्यामागचा उद्देश काय होता? पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर नेमके काय घडवून आणायचे होते? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उपाय सुचवण्याऐवजी सरकार बदलले पाहिजे अशा घोषणा देत २०२९ च्या राजकारणाची तयारी केली जात आहे. विरोधकांना सभागृहात या विषयावर विधायक चर्चा करायची नाही. त्याऐवजी आंदोलनाच्या माध्यमातून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच केंद्र सरकारची भूमिका आहे, असेही शिंदे म्‍हणाले.

उद्धव ठाकरे यांना दुसरे काहीच काम उरलेले नाही

उद्धव ठाकरे यांना दुसरे काहीच काम उरलेले नाही. मुख्यमंत्री असताना ते अवघ्या दोन वेळाच मंत्रालयात गेले. आता मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जाऊन त्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. जनतेने ज्यांना नाकारले, तेच आता विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन सरकारविरोधी वातावरण निर्माण करत आहेत.

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू; कोयना धरणात ६४ टीएमसी पाणी, कृष्णा, वेण्णा नदीपात्रात पाणी पातळी वाढली
पुढील बातमी
संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग चौथ्या दिवशीही लोकसभा-राज्यसभा ठप्प; विरोधक राजीनाम्यावर ठाम

संबंधित बातम्या