सातारा हिल रनर्सचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात; डॉ. सुधीर पवार यांचा सपत्नीक विशेष गौरव

by Team Satara Today | published on : 06 October 2026


सातारा : निरोगी जीवनशैली आणि धावण्याची संस्कृती रुजवण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘सातारा हिल रनर्स’ समूहाचा द्वितीय वर्धापन दिन स्वराज मंगल कार्यालयात विविध उपक्रमांसह उत्साहात संपन्न झाला.
डॉ. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी सातारकरांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच व्यापक स्वरूप धारण केले आहे. या आरोग्य चळवळीत आज विविध वयोगटांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून, नियमित वर्कआउट, धावण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि नवोदित धावपटूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य समूहामार्फत निरंतर सुरू आहे.
या सोहळ्यात वर्षभर नियमित सराव करणाऱ्या सदस्यांसह विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धावपटूंचा आणि दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. आरोग्य व धावण्याची चळवळ निःस्वार्थ भावनेने साताऱ्यात रुजवणारे डॉ. सुधीर पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. नीलिमा पवार यांचा यावेळी मावळ्याच्या वेशभूषेत मानपत्र तसेच ढाल-तलवार प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सातारा हिल मॅरेथॉन, स्वास्थ्यन फिटनेस आणि स्वयंभू फिटनेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी समूहाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा घाटगे, चंद्रकांत पवार, चिंतामणी कोठावळे व भद्रेश शहा यांनी केले.
सातारा हिल रनर्सचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे आणि नियोजनामुळे हा वर्धापन दिन उत्साहात पार पडला असून, स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँक निवडणूक : छाननीत १२ उमेदवारांचे अर्ज बाद; सुरभी भोसले, प्रकाश बडेकरांना दिलासा

संबंधित बातम्या