आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या समृद्धी व यश यांची निवड

जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 18 April 2025


सातारा : पंधरा वर्षाखालील मुला-मुलींच्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये सातारच्या समृद्धी शिंदे आणि यश निकम यांची निवड बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया समिती यांच्यामार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

रोहतक हरियाणा येथे पंधरा वर्षाखालील एशियन बॉक्सिंग स्पर्धेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र संघात सातारच्या समृद्धी सतीश शिंदे याने 52 ते 55 किलो वजन गटात, तर यश भगवान निकम याने 30 ते 33 किलो वजन गटात प्रथम स्थान मिळवले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची जॉर्डन येथे दिनांक 18 एप्रिल ते 2 मे दरम्यान होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ते या स्पर्धेसाठी भारतीय संघाबरोबर रवाना झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातून बॉक्सिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच कामगिरी करणारे हे दोघे ठरले आहेत. त्यांना एन आय एस कोच सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. समृद्धी शिंदे व यश निकम यांनी सातारा जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर चमकवल्याबद्दल आम्हाला त्यांचा व प्रशिक्षक सागर जगताप यांचा अभिमान आहे, असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केले असून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

समृद्धी व यश यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, रवींद्र झुटिंग, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सल्लागार अशोक शिंदे, राजेंद्र हेंद्रे, निवृत्ती भोसले, प्रताप गुजले, योगेश मुंदडा व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशाची लष्करी शक्ती अव्वल
पुढील बातमी
विनोद कुलकर्णी यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार

संबंधित बातम्या