महाबळेश्वर : येथील शहरातील रहदारीस अडथळा ठरणारी टपरीवर आज पालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई करत हटविली. या वेळी टपरी मालकासह त्याच्या नातेवाइकांनी घातलेल्या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील आठ जणांविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जावेद मोहमद वारुणकर (वय ४५), आहाद साबीर खान (वय २१), समद साबीर खान (वय ३१), हसीना साबीर खान (वय ५६), सुमीरा जावेद वारुणकर (वय ३५), जरिना मोहम्मद वारुणकर (वय ४०, सर्व रा. गवळी मोहल्ला/स्कूल मोहल्ला, महाबळेश्वर) यांच्यासह सायका मुज्जफर जुंद्रे (वय ३०, रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) व एक अनोळखी व्यक्ती अशा आठ जणांविरुद्ध सार्वजनिक रस्त्यावर जमाव जमवून दंगा करून पालिका अधिकारी व प्रशासनास शिवीगाळ करून वारंवार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी, येथील शहरातील तानू पटेल स्ट्रीट येथील मच्छी चौकातील जावेद वारुणकर यांची रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमित टपरी आहे. आज पहाटे पोलिस बंदोबस्तात पालिकेचे प्रशासक योगेश पाटील, प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन केणेकर, निवासी नायब तहसीलदार दीपक सोनावले यांच्या देखरेखीखाली पोलिस, पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हटविण्यात आली.
दरम्यान, टपरी हटविल्यानंतर मालकासह त्याच्या नातेवाइकांनी घातलेल्या गोंधळामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील आठ जणांविरुद्ध पालिका स्थापत्य अभियंता मुरलीधर धायगुडे यांच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेने भर पावसात ही कारवाई केली. पालिका व पोलिस कर्मचारी निघून गेल्यानंतर जावेद वारुणकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा गोंधळ घातला. काही वेळातच त्याच जागी पुन्हा एक हातगाडा लावण्यात आला. पुन्हा नव्याने लावलेला हातगाडाही काही वेळातच पालिका व पोलिस प्रशासनाने हटवला. या वेळी वारुणकर कुटुंबातील महिला व युवकांनी पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.
या वेळी पालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांच्यासह वरिष्ठ लिपिक आबाजी ठोबळे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अमित माने, पाणीपुरवठा अभियंता प्रवीणकुमार बोरगे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार दीपक सोनावले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता.
टपरी अनधिकृत असल्याची माहिती पालिका प्रशासनास होती. याबाबत वेळोवेळी जावेद वारुणकर यांना टपरी हटविण्याबाबत पालिकेच्या वतीने नोटिशी बजाविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही टपरी संबंधितांनी हटविली नाही. त्यानंतर तीन वेळा पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक टपरी हटविण्यासाठी गेले होते. मात्र, या कुटुंबातील युवक व महिलांनी शिवीगाळ केल्यामुळे हे पथक रिकाम्या हाताने परत आले.