सातारा : सोबत फिरायला येण्यास नकार दिल्याच्या रागातून युवतीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्यावर अश्लील फोटो प्रसारित केल्याप्रकरणी किरण घाडगे (रा. मलकापूर, कराड) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संशयिताने युवतीशी संपर्क साधून तिला आपल्यासोबत बाहेर येण्यास सांगितले. मात्र, युवतीने त्यास नकार दिला. त्यानंतर संशयिताने फोन करून तिच्या आई-वडिलांसह भावाला मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
धमकीनंतरही प्रकार थांबला नाही. संशयिताने युवतीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट सुरू केले. या अकाउंटवर अश्लील फोटो प्रसारित करून तिची बदनामी करण्यात आली. त्यामुळे युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.
बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा