मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये सोनाली कुलकर्णीचं नावही आवर्जुन घेतलं जातं. सोनालीने तिच्या अभिनयाने आणि टॅलेंटच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं. अनेक विविधांगी भूमिका तिने उत्तमप्रकारे वठवल्या. 'ग्राभीचा पाऊस', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'कच्चा लिंबू', 'देऊळ', 'दोघी' हे तिचे काही गाजलेले सिनेमे. तर 'सिंघम', 'दिल चाहता है', 'प्यार तुने क्या किया', 'भारत' या हिंदी सिनेमांमध्ये ती झळकली. आता ती सुशीला सुजीत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सोनालीच्या अभिनयाचं आणि तिने साकारलेल्या भूमिकांचं अनेकदा कौतुकही झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील सोनालीचं कौतुक केलं होतं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने हा किस्सा सांगितला.
मी एकदा जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी चेन्नईला चालले होते. मी एकटीच होते. एक अतिशय सुंदर मुलगी तिची आई आणि बहिणीबरोबर चालली होती. विमानात ती एअरपोर्टवर दिसलेली मुलगी परत मला दिसली. ती मला म्हणाली की "तुम्ही दोघी या सिनेमात होतात ना?" मी तिला हो म्हटलं आणि विचारलं तुला मराठी कळतं का? तर ती मला म्हणाली हो आणि मला तुझं कामही आवडतं. तो चेहरा माझ्या लक्षात राहिला. मी तिला थँक्यू म्हटलं. तू दिसायला गोड आहेस, असं तिला म्हणून मी निघाले.
दुसऱ्या दिवशी माझं जिथे शूट होतं तिथे मला सांगण्यात आलं की तुम्हाला मेकअप रुम शेअर करावी लागणार आहे. मी म्हटलं ठीक आहे. आणि तिथे तीच मुलगी होती. मग मी तिला म्हटलं तू अभिनेत्री आहेस? ती म्हणाली हो...तिला मी विचारलं की तुझं नाव काय आहे? तेव्हा तिने सांगितलं की विद्या बालन. आणि विद्याला हे अजूनही लक्षात आहे.