अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत पाठवून परिवर्तनाची सुरुवात करा - जयंत पाटील; महाविकास आघाडीने फुंकले रणशिंग, हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रचाराला साताऱ्यातून सुरुवात

by Team Satara Today | published on : 11 October 2026


सातारा : पदवीधरांची बेरोजगारी आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीने पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत पाठवून परिवर्तनाची सुरुवात करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.  हर्षदा देशमुख जाधव यांना पसंतीक्रमाच्या मतांतून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख जाधव व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकरयांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत क्रांतीची परंपरा आहे. सध्या राज्यातील जनतेमध्ये अस्वस्थता आणि खदखद आहे. पदवीधरांच्या बेरोजगारीचे प्रश्न तसेच शिक्षकांच्या समस्यांची सभागृहात प्रभावी मांडणी करून त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. प्रसंगी या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारीही हवी, असे जयंत पाटील म्हणाले. हर्षदा देशमुख जाधव यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व वरिष्ठ सभागृहात जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शशिकांत शिंदे यांनी सुशिक्षित, युवा आणि अभ्यासू नेतृत्वाला संधी दिल्याचे सांगत मतदारांनी हर्षदा देशमुख जाधव यांना विजयी करावे, असे आवाहन केले. शरदचंद्र पवार यांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या उमेदवाराला मतदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हर्षदा देशमुख जाधव यांनी महिला, युवक आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. विविध प्रश्नांवरून समाजात अस्वस्थता असून, लोकशाहीत मतदानाचा अधिकार बजावून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत साताऱ्यातून प्रचाराला सुरुवात झाल्याने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बेरोजगारी, शिक्षकांचे प्रश्न आणि संघर्षशील नेतृत्व हे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाचा भक्तिमय जागर; आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरांचे रूपडे पालटले; घटस्थापना, देवीच्या स्वागतासाठी लगबग
पुढील बातमी
साताऱ्यातील करंजे पेठ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या