रत्नागिरीचा भावेश नीट परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात पहिला, देशात चौथा क्रमांक, भावेशला ७२० पैकी ६६६ गुण मिळाले

by Team Satara Today | published on : 18 July 2026


रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपुत्र भावेश सुरेश चव्हाण याने नीट-यूजी पुनर्परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात पहिला व देशात चौथा क्रमांक मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा (नीट-यूजी) २०२६ चा निकाल दि. १६ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या भावेशने एसटी प्रवर्गात राज्यात पहिला व देशात चौथा क्रमांक मिळवला आहे. भावेशला ७२० पैकी ६६६ गुण मिळाले आहेत.

भावेशची आई सुरेखा सुरेश चव्हाण या रत्नागिरी येथे विद्युत निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मूळ नाशिक येथील चव्हाण कुटुंबीय १५ वर्षांपूर्वी रत्नागिरीत स्थायिक झाले. भावेशचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील माने इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले असून, सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. दहावीलाही भावेशने प्रथम क्रमांक मिळविला होता. 

दहावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची इच्छा असल्याने नीट-यूजी परीक्षेच्या तयारीसाठी अकरावीत लातूर येथे प्रवेश घेतला होता. संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेज येथे अकरावी, बारावीसोबतच नीट-यूजी परीक्षेची तयारी सुरू होती. महाविद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे त्याची निवड झाली होती. परिश्रम, चिकाटी व जिद्द या त्रिसूत्रीनेच भावेशने यश संपादन केले आहे. सध्या भावेशच्या आईची मुंबईत बदली झाली असून, वडील सुरेश रत्नागिरीतील एका वर्तमानपत्रात कार्यरत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धमक्यांना घाबरत नाही, आता मी स्वतः दिल्लीला जाणार - अभिजित दिपकेंच्या वडिलांचा निर्धार, आंदोलकांच्या मागण्यांमध्ये काहीही वावगे नाही
पुढील बातमी
कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम काम करा, नैतिकता जपा; तुकाराम मुंढे यांचं तरुणांना आवाहन, शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

संबंधित बातम्या