सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सातारा यांच्या वतीने शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
समितीने मागील महिन्यात शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुतळा परिसरातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते. त्यातील केवळ एकच मागणी पूर्ण करण्यात आली असून इतर मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच पुतळ्याच्या मागील बाजूस असलेली गृहविभागाची (सरकारी) जागा विकसित करण्याचे काम सुरू असताना, पुतळा परिसराच्या विस्तारासाठी मागील बाजूस २० बाय १०० फूट जागा देण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने तयार करून जिल्हाधिकारी व गृहविभागाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबतही सकारात्मक हालचाल झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून, जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात आंबेडकरी विचारांच्या विविध संस्था, संघटना तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व सरचिटणीस गणेश कारंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.