सातारा : शूरवीर जिवाजी महाले यांच्या कुटुंबातील एका महिलेविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शिवरक्षक शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी साताऱ्यात निवेदन आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोंडवली (ता. वाई) येथे शूरवीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याचे काम विविध संस्था आणि मान्यवरांच्या सहकार्याने सुरू आहे. या स्मारकासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून कुटुंबालाही मदत करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
यावेळी शिवरक्षक शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक व राज्याध्यक्ष मंगेश काशीद यांनी भूमिका मांडताना, संबंधित तक्रारीमुळे महिलेच्या सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले. या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ नये आणि वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी प्रशासनाने निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात तक्रारीची सखोल चौकशी करावी, चौकशीत निष्पन्न होणाऱ्या बाबींनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, संबंधित महिलेला आवश्यक संरक्षण द्यावे तसेच समाजात संभ्रम किंवा तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच प्रकरणाशी संबंधित तांत्रिक पुरावे व संपर्क नोंदींची तपासणी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या आंदोलनात कृष्णत जाधव, दत्तात्रय तावरे, गणेश कदम, चंद्रकांत सपकाळ, नवनाथ काशीद, बजरंग काशीद, रवी पवार, धनाजी गायकवाड, जीवन मसुरकर, तुषार काशीद, आदिक कदम, चंद्रकांत गायकवाड, नारायण सरडे, राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी सातारा आणि पोलीस अधीक्षक सातारा यांना पाठविण्यात आल्या आहेत.