कराड : आगाशिवनगर येथील देवकर कॉलनी परिसरात जुन्या पूर्ववैमनस्यातून दोन युवकांच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे आगाशिवनगर आणि मलकापूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगरमधील देवकर कॉलनी परिसरात काही युवकांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी आणि आपापसांतील मतभेद मिटवण्यासाठी अक्षय संजय मोकाशी (वय ३२, रा. आगाशिवनगर) हे मध्यस्थी म्हणून त्या ठिकाणी गेले होते. वाद मिटल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असतानाच, त्या ठिकाणी अचानक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार वेगाने आली.
फिर्यादीनुसार, संशयित आरोपी रोहित अर्जुन पोळ याने त्याचे जुने वैमनस्य आणि रोहित लाखे यांच्याशी असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ वाहनाचा वेग वाढवला. त्याने कोणतीही तमा न बाळगता अक्षय मोकाशी व रोहित लाखे यांच्या अंगावर थेट गाडी घातली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर जोराने फेकले गेले.
या अपघातामध्ये अक्षय मोकाशी यांच्या खांद्याला, हाताला, गुडघ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दोन्ही गटांतील जुने वाद आणि पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा उफाळून आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कराड शहर पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.