सातारा : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई च्या जीवनावर आधारीत नृत्य आणि उत्कृष्ट हालचाली, योग्य समन्वय आणि सादरीकरणामुळे गोकुळच्या विद्यार्थी वर्गाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या नृत्य स्पर्धेत गोकुळ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
निमित्त होते, जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व ग्रंथ महोत्सवाचे ! सध्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरी अर्थात, येथील जिल्हा परिषद मैदान येथे उत्साहात संपन्न झाले.
शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात येथील सातारा जिल्हा बालविकास समिती संचलित गोकूळ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथमहोत्सव 2025 अंतर्गत आयोजित नृत्य स्पर्धेत प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा मान उंचावला आहे. या विद्यार्थ्यांनी आपले अचूक आणि सुमधूर गीत सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक शाळामधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
गोकुळ शाळेने प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक मिळवून कौतुकास्पद कामगिरी तसेच उत्तम यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्षा शंकुतला कासट , सचिव विनोद कुलकर्णी, उपाध्यक्ष सागर प्रभाळे व इतर मान्यवर सदस्य यांनी सहभागी विद्यार्थ्याचे, मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले.