सातारा : महागाव येथे संपन्न झालेल्या २२ महाराष्ट्र बटालियनच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात (CATC) सातारा येथील गुरुकुल स्कूलने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील ३१ शाळांच्या सहभागात गुरुकुलने ५ सांघिक प्रथम पारितोषिके आणि १६ वैयक्तिक पदके जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
कोल्हापूर मुख्यालयांतर्गत २२ महाराष्ट्र बटालियन सातारा यांच्या वतीने दि. २१ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत महागाव येथे या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले (सेनामेडल), ॲडम ऑफिसर आनंद सिंग, सुभेदार मेजर संजीवकुमार हिरेमठ, जेसीओ, एनसीओ आणि एएनओ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित अशा ३१ विद्यालयांतील एनसीसी छात्र या शिबिरात सहभागी झाले होते.
या शिबिरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये गुरुकुलच्या कॅडेट्सनी नेत्रदीपक यश संपादन करत बेस्ट स्कूल, बेस्ट ड्रिल, बेस्ट ग्रुप डान्स, रस्सीखेच आणि सांस्कृतिक स्पर्धा अशा सर्वच प्रमुख प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच फायरिंग स्पर्धेत सम्राज्ञी अटकेकरने द्वितीय, तर दर्शिका देवलने तृतीय क्रमांक मिळवला. कॅम्प सिनियर म्हणून तनिष्का रेवले हिने जबाबदारी सांभाळली. क्वार्टर गार्ड पथकात शुभम सरकार, पृथ्वीराज साळुंखे, अक्षया काटकर, अधिराज शिंगाडे, विराज माने, राधा पिसाळ यांनी उत्कृष्ट संचलन केले. पायलेटींग प्रकारात निधी इंगवले, सान्वी अचिंतलवार, अधिराज शिंगाडे व विराज माने यांनी चमक दाखवली, तर दर्शिका देवल हिने क्वार्टर गार्ड ब्रीफिंग उत्तमरीत्या पार पाडले. कॅम्प फोटोग्राफीत आशुतोष कुंदप व क्षितीज गणदास यांनी कौशल्य दाखवले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना निकम हिने केले, तर धैर्या कुलकर्णी हिची मानाच्या 'आरडीजीसी' (RDGC) शिबिरासाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल बोलताना गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वयंशिस्त रुजवण्यासाठी चार वर्षांपूर्वी शाळेत एनसीसी विभाग सुरू करण्यात आला होता. अवघ्या चार वर्षांत शाळेच्या कॅडेट्सनी सलग तीन वर्षे शिबिरात प्रथम क्रमांक मिळवून संस्थेचा गौरव वाढवला असून भविष्यात हे विद्यार्थी राष्ट्रसेवेत मोलाचे योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले (सेनामेडल) यांनी गुरुकुलच्या ट्रूपचे विशेष कौतुक केले. या विद्यार्थ्यांना एनसीसी अधिकारी (ANO) सौ. मेघा तपासे व प्रशिक्षक दत्तात्रेय येवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेच्या ॲड. ऐश्वर्या चोरगे, प्रशासकीय अधिकारी शीला वेल्हाळ, मुख्याध्यापिका अनुराधा कदम, सोनाली तांबोळी, सचिव आनंद गुरव, अर्जुन चोरगे, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.