शेंद्रेत चारचाकीतून गांजाची वाहतूक; २५ किलोचा साठा जप्त, सातारा तालुका पोलिसांची कामगिरी

by Team Satara Today | published on : 22 November 2026


सातारा : पुणे-कोल्हापूर मार्गावरील शेंद्रे परिसरात गांजाची वाहतूक करण्याचा प्रयत्न सातारा तालुका पोलिसांनी हाणून पाडला. शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी २४ किलो ९६० ग्रॅम ओला गांजा जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनासह १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शेंद्रे परिसरातून चारचाकी वाहनाद्वारे गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी संशयास्पद स्थितीत उभी असलेली चारचाकी दिसल्यानंतर पथकाने वाहनाची तपासणी केली. वाहनातील एका पोत्यात गांजा आढळून आला.
पोलिसांनी वाहनातील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. साहिल तानाजी चंदनशिवे (वय २३, रा. मांडवे, ता. खटाव) आणि वैभव रामलिंग गाडेकर (वय ३४, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.
जप्त केलेल्या गांजाची किंमत ६ लाख २४ हजार रुपये आहे. तसेच चारचाकी वाहन, मोबाईल हँडसेट व अन्य साहित्य असा एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी हवालदार दादा स्वामी यांनी फिर्याद दिली असून, उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वीकृत सदस्यांसाठी २५ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार; निवडीसाठी इच्‍छुकांचे लॉबिंग, झेडपीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेला सहा जागा
पुढील बातमी
आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्याचा क्षेत्र माहुली येथील महिलेला ८.६० लाखांचा ऑनलाइन गंडा

संबंधित बातम्या