सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची गुढी उभारणार कोण ?; अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार

by Team Satara Today | published on : 19 March 2026


सातारा  : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड शुक्रवार दि. 20 मार्च रोजी होणार असून त्या दृष्टीने साताऱ्यात महायुतीमध्ये कोणते दोन घटक पक्ष सत्तेची गुढी उभारणार हा उत्सुकतेचा विषय आहे. भारतीय जनता पार्टी 33 चे संख्या बळ गाठणार का का त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार या विषयी राजकीय वर्तुळात विश्लेषण सुरूझाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तावीस राष्ट्रवादी काँग्रेसला 20 तर शिवसेना शिंदे गटाला 15 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अपक्ष एक काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे .भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष भाजपचाच व्हावा अशी आग्रही भूमिका घेतली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संख्याबळाचे गणित जुळवत अध्यक्ष आमचाच होणार असा दावा केला आहे. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचे सर्व सदस्य यापूर्वी सहलीला गेले आहेत.  कोणताही दगाफटका होणार नाही याची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेतली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुका होऊन आता एक महिना उलटत आला तरी अध्यक्ष पदाचा प्रश्न सुटलेला नाही .जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळाल्या तरी त्या बहुमताला पुरेश्या नाहीत. फलटण येथे झालेल्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट सावध झाले आहेत .भाजपचे संख्याबळ 28 असून त्यांना आणखी पाच सदस्यांची गरज आहे.

गुढीपाडव्याचा सण साजरा झाल्यानंतर शुक्रवार दि. 20 रोजी निवडीच्या निमित्ताने सत्तेची गुढी उभारली जाणार आहे. ती गुढी भाजपची की शिवसेना राष्ट्रवादीची यावरून रस्सीखेच सुरू आहे. सहलीवर गेलेल्या सर्व सदस्यांना त्यांच्या पक्षाने व्हीप बजावला असून थेट निवडीच्या वेळीच त्यांचे सातारा आगमन होणार आहे. ऑपरेशन लोटसच्या भीतीने सर्व सदस्यांची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जात आहे. 

भारतीय जनता पार्टीचे राजकीय धुरंदर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांची राजकीय खेळी काय असणार याची अद्यापही कोणाला खबरबात नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदस्यांवर आपला जागता पहारा ठेवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय गुढीचा सस्पेन्स अजूनही अध्यक्ष पदाच्या निमित्ताने कायम आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रत्नागिरीत दाऊदच्या जमिनींचा लिलाव अखेर यशस्वी; मुंबईतील गुंतवणूकदाराची सर्व भूखंडांवर मालकी
पुढील बातमी
कोर्टातील तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी; एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या