एमबीए/एमएमएस प्रवेशाची दुसरी यादी जाहीर; १४ हजार ८६ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी

by Team Satara Today | published on : 13 August 2026


मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने व्यवस्थापनशास्त्राच्या (एमबीए/एमएमएस) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. राज्यभरातील २७ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते. त्यापैकी १४ हजार ०८६ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, ११ हजार ५११ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या तीन पसंतीक्रमांपैकी एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाच्या राज्यात एकूण २९ हजार ४८७ जागा उपलब्ध होत्या. दिलेल्या मुदतीत २७ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरल्याने याच विद्यार्थ्यांचा दुसऱ्या सामायिक प्रवेश प्रक्रिया (कॅप) फेरीसाठी विचार करण्यात आला. त्यापैकी १४ हजार ०८६ विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप झाले.

पहिल्या तीन पसंतीक्रमांपैकी एक महाविद्यालय मिळालेल्या ११ हजार ५११ विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘ऑटो फ्रिज’ झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश नाकारल्यास त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नसून त्यानंतरच्या खुल्या अर्थात संस्थात्मक फेरीतच प्रवेशाची संधी मिळेल. असा इशाराही सीईटी सेल कडून देण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी १३ ते १७ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून शुल्क भरत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर १८ ऑगस्टला तिसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
15 ऑगस्टपासून जलसंधारण अभियानाचा शुभारंभ - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती, सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा होणार

संबंधित बातम्या