सातारा : कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मनीमंगळसूत्र असा 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज दोन अल्पवयीन मुलांनी हिसकावून चोरून नेला. मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या दोन पथकांनी 24 तासात चोरी करणारी दोन्ही अल्पवयीन मुले ताब्यात घेतली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निशीकांत सुतार व त्यांची पत्नी रंजना सुतार हे दोघे शनिवारी कोयना एक्स्प्रेसमधून पुणे ते सांगली असा प्रवास दिव्यांग डब्यातून करत होते. या प्रवासात त्याच गाडीतून पुणे येथून दोन अल्पवयीन मुले त्यांच्यावर वॉच करत होती. गाडी तारगाव रेल्वे स्टेशन येथे आली असता या अल्पवयीन मुलापैकी एकाने महिला प्रवाशांच्या गळ्यातील 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व 3 ग्रॅम वजनाचे मनीमंगळसूत्र असा 4 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज हिसका मारून पोबारा केला. दोघांनीही गाडीतून उडी मारून पळ काढला. गाडी कराड रेल्वे स्थानकात असता या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली.
मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी काळे यांनी तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यासह सातारा रेल्वे पोलिसांचे स्वतंत्र पथक अशी दोन पथके तयार करून घटनास्थळाची पाहणी केली. तारगाव, मसूर, तळबीड परिसरात रात्रभर नाकाबंदी केली तसेच शोधाशोधही ठिकठिकाणी सुरू करण्यात आली. शोध मोहीम राबवताना दोन्ही अल्पवयीन मुलांना मसूर रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेण्यात आलेे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व तुटलेले 2.5 ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र असा 3 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दोन्ही अल्पवयीन मुलांना सातारा येथील बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे.
मिरज व सातारा येथील लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने 24 तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेवू् त्यांच्याकडून ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही अल्पवयीन मुले सराईत असून त्यांच्याविरूध्द तळबीड व मसूर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत. या गुन्ह्याचा तपास लोहमार्गचे पोलिस अधिक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी काळे, पोलिस हवालदार नितीन थोरात, मोहसीन पटेल, अमर सावंत, दिपक घाडगे, अन्सार मुजावर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेश भोसले, सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरिक्षक हजारे, अमर देशमुख यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून कामगिरी पार पाडली.