महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील एस. टी. स्थानक समोर असलेल्या श्रेयस हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आलेल्या एका तरूणीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. रागिणी कुमारी सिनिल साव (वय 19 मूळ रा. मुशी मरी, बिहार) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नागपूर येथील प्रथम इन्स्टिट्यूट येथून प्रशिक्षण घेऊन परराज्यातील चार तरुणी हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आल्या होत्या. यामध्ये रागिनीचा समावेश होता. रागिणी कुमारी ही आपल्या मैत्रिणी समवेत हॉटेलच्याच कर्मचार्यांसाठी असलेल्या खोलीत राहत होती. तिच्या इतर मैत्रिणी रात्री आपली ड्युटी संपवून पुन्हा रूमच्या दिशेने आल्या. एक तास दरवाजा ठोठावून देखील कोणताही आवाज न आल्याने त्यांना संशय आला. याबाबतची माहिती त्यांनी हॉटेल मॅनेजर यांना दिली. त्यानंतर कुणीही उघडत नसल्याचे पाहून दरवाज्या तोडून रूममध्ये प्रवेश केला.
यावेळी बाथरूम देखील आतून बंद होते. बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिले असता रागिणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हॉटेल व्यवस्थापनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची कल्पना तिच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.