सातारा : आमच्या गट, गणामध्ये ’हे’ आरक्षण पडले नाही. आता ’आमचेच’ आरक्षण पडणार... असा अंदाज बांधून बसलेल्यांचा भ्रमनिरास होणार आहे. ग्रामविकास विभागाने आज राजपत्र प्रसिध्द केले असून, आता मागील आरक्षण सोडतीचा विचार न करता, चक्रानुक्रमानुसार नव्याने आरक्षण सोडत होणार आहे. आरक्षण सोडतीबाबत ही पहिली निवडणूक होणार असल्याने आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुले दिवाळीनंतर लागण्याची दाट शक्यता आहे. पहिल्यांदा महानगरपालिका, नगरपालिका अथवा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागणार, हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्सुकता ताणून राहिली आहे.
नगरपालिकांची प्रभागरचना अंतिम झालेली नाही. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची प्रभागरचना आज अंतिम झाली आहे. त्यामुळे नगरपालिकांपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका लागण्याची शक्यताही प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 11 पंचायत समिती आज अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याची यादी सर्व तहसील कार्यालये, पंचायत समिती कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
असे असेल आरक्षण
सर्वसाधारण प्रवर्ग महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी), नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती (एसटी) अनुसूचित जमाती महिला.
प्रभाग रचनेत असे झालेत बदल...
जावळी तालुक्यात गटांतर्गत गणांमध्ये दोन जागांचा बदल करण्यात आला आहे. कुसुंबी गटातील वाकी आणि निपाणी ही दोन गावे पूर्वी आंबेघर तर्फे मेढा गणात होती, ती आता कुसंबी गणात घेतली आहेत.
माणमधील बिदालमधून गटातून तोडले गाव हे मलवाडी गणात घेतले आहे. शंभूखेड गाव हे मार्डी गणातून वरकुटे-म्हसवड गणात घेतले आहे. मार्डी गटातील आणि म्हसवड गणातील वाकी हे गाव गोंदवले बुद्रुक- पळशी गणात घेतले आहे.
खटाव तालुक्यात म्हसुर्णे गटाचे नाव होते, ते आता पुसेसावळी गट झाला आहे. कारखटाव गटातील व गणातील हिवरवाडी गाव कमी करून कलेढोण गणात दिले आहे.
सातारा तालुक्यातील खेड गटातील क्षेत्र माहुली गणातील आसगाव हे पाटखळ गटांमधील शिवथर गणात दिले आहे. शेंद्रे गटातील निनाम गणातील सोनापूर हे गाव नागठाणे गटातील अतित गणात जोडले आहे. नागठाणे गट आणि अतित गणातील वेणेगाव हे गाव वर्णे गटातील अपशिंग गणात जोडले आहे. कारी गटातील कारी गणातील पुनवडी गाव हे परळी गणात दिले आहे.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गट आणि गणात शेरे गणातील जाधव मळा हे गाव शेरेतून रेठरे गणात घेतले आहे.
पाटण : गोकुळ तर्फे हेळवाक आणि जोतिबाची वाडी ही दोन गावे म्हावशी गटातून काढून गोकुळ तर्फ हेळवाक गटात घेतले आहे. तारळे गटातील केरळ व धडामवाडी ही दोन गावे म्हावशी गट आणि गावात आली आहे. गोकुळ तर्फे हेळवाक मध्ये गटांतर्गत डिचोली, पुनवली, झाडवली, मानाईनगर, मिरगाव ही अगोदरच्या गोकुळ तर्फे हेळवाक गणात आली आहेत. पूर्वीचा कामरगाव गण आता आण आताचा एरड कमी झाला आहे. कोरेगाव, फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यातील गट, गणांच्या प्रभागरचनांमध्ये काही बदल झालेले नाहीत.
जिल्हा परिषदेची अंतिम प्रभारचना आज जाहीर झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका झाल्यानंतरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंचवार्षिक मुदत संपली असतानाही गावकर्यांना अजून सहा महिने वाटच पहावी लागणार आहे.