सराफी व्यावसायिकाच्या लुटीचा २४ तासांत छडा; सोलापूरच्या टोळीसह स्थानिक सूत्रधार जेरबंद

म्हसवड आणि सातारा एलसीबीची संयुक्त कारवाई; सोने-चांदीचे दागिने, स्विफ्ट कार आणि तलवारीसह ११.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 28 November 2026


म्हसवड : सराफी व्यावसायिकाला कारने धडक देऊन तलवारीचा धाक दाखवत लुटल्याच्या घटनेचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांसह कटाचा स्थानिक सूत्रधार अशा चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवापूर ते पळसावडे (ता. माण) या मार्गावर ही लुटीची घटना घडली होती. पळसावडे येथील सराफी व्यावसायिक नवनाथ वसंत खुपकर हे दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना निर्जन ठिकाणी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत खुपकर रस्त्यावर कोसळून जखमी झाले. त्यानंतर कारमधून उतरलेल्या हल्लेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि सांगलीच्या दिशेने पलायन केले. या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक घोडके यांनी उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार केले.
या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला सुरुवात केली. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती संकलित करत सातारा, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली. विविध दिशांनी तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सोलापूर जिल्ह्यातील संशयित आरोपींची ओळख पटवली.
गुन्हा केल्यानंतर आरोपी आपापल्या गावातून पसार झाले होते. त्यामुळे एलसीबी आणि म्हसवड पोलिसांच्या पथकांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या गावांच्या परिसरात वेशांतर करून पोलिसांनी सापळा रचला होता. दरम्यान, तीन संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातील धुळदेव-पिलीव घाट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या तपासात या लुटीमागे स्थानिक पातळीवरूनच कट रचण्यात आल्याचे निष्पन्न झाले. देवापूर (ता. माण) येथील स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील मारुती मंडले हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. त्याने सराफी व्यावसायिक नवनाथ खुपकर यांच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अजय सत्यवान शिरतोडे आणि शुभम दुर्योधन बोडरे (दोघे रा. वाकी शिवणे, ता. सांगोला) तसेच रोहित दादासाहेब जाधव (रा. महूद, ता. सांगोला) यांना या कटात सहभागी करून घेतले होते.
या चौघांनी संगनमताने लुटीचा कट रचून त्याची अंमलबजावणी केली. गुन्हा घडल्यानंतर मुख्य आरोपींना लपण्यासाठी स्थानिक सूत्रधार सुनील मंडले याने आश्रय दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे स्थानिक सूत्रधारासह अन्य तीन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी लुटलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार आणि तलवार जप्त केली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख ५० हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, अभिजित यादव, रोहित फार्णे, उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, परितोष दातीर यांच्यासह राजू मुलाणी, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, संजय जाधव, सनी आवटे, हसन तडवी, अमित झेंडे, अजय जाधव, नवनाथ कदम, अमृत कर्पे, अमित सपकाळ, अरुण पाटील, शिवाजी भिसे, राजू कांबळे, अमित माने, मनोज जाधव, ओंकार यादव, मोहन पवार, इरफान मुलाणी, स्वप्निल शिंदे, किरण जगताप आणि विजय निकम यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे अमर नारनवर, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकोळे, संतोष काळे, धीरज कवडे आणि सतीश जाधव यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी क्रेन भाडेततत्वावर घेण्याबाबत आवाहन

संबंधित बातम्या