सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केलेल्या कथित चुका तातडीने दुरुस्त कराव्यात; अन्यथा आगामी आंदोलनाची तीव्रता सरकारला परवडणार नाही, असा आक्रमक इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी साताऱ्यात दिला.
आतापर्यंतच्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवाने पुन्हा आंदोलनात उतरावे. तसेच आजवर आंदोलनापासून दूर राहिलेल्यांनीही आता या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. “सरकारला ५७ लाख नोंदीही द्यायच्या नाहीत, हा अन्यायही आपल्याला मोडून काढायचा आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाचा उल्लेख करत जरांगे म्हणाले की, या आंदोलनाबाबत सर्वांच्या भावना विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, आता आंदोलन निर्णायक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या जुन्या कुणबी नोंदींचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. “दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी रद्द करण्याची भाषा केली जाते. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले जाते; मग मुख्यमंत्री काय करतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना जरांगे म्हणाले, “तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले आहे. मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, ती पुन्हा द्या. मराठा समाजाची ताकद तुम्हाला लवकरच कळेल.”
मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणातून कोणाचे आरक्षण हिसकावून घेण्याची मागणी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ओबीसींचे एक टक्काही आरक्षण आम्हाला द्या, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हटलेले नाही. मग ‘कोणाचेही ओरबाडून आरक्षण देणार नाही’ या सरकारच्या वक्तव्याला अर्थ काय?” असा सवाल त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, रद्द झालेली एसीबीसी प्रमाणपत्रे ग्राह्य धरून संबंधित तरुणांना नोकऱ्या द्याव्यात, बार्टी-सारथी योजनांच्या पूर्वीच्या सवलती पुन्हा लागू कराव्यात आणि महसूल विभागाकडून झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
“मला सत्तेत रस नाही. सत्ता त्यांनाच लखलाभ असो. मला फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे आणि त्यासाठीचा हा माझा प्राणांतिक लढा असेल,” असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले.
गाडी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “मी इमानदारीने काम करतोय म्हणून मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मला गाडी देण्यात आली आहे. गाडी आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही.