कराड : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील ऐतिहासिक 'प्रीतिसंगमा'वर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशासकीय स्तरावरून जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची उपस्थिती होती.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे पाईक होते. साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे. दादा नेहमीच कराड दौऱ्यावर असताना प्रीतिसंगमावर नतमस्तक होत असत. आज त्याच परंपरेचे पालन करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी स्व. अजितदादांच्या आठवणीने उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मन भरून आले होते.