भाजप, आरएसएसकडून लाेकतंत्र संपवण्याचे काम; काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी. एम. संदीप यांचा आरोप

by Team Satara Today | published on : 12 October 2025


सातारा :  भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लाेकतंत्र संपवण्याचे काम सुरु आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही देणे घेणे नाही. भाजपच्या केंद्र व राज्यातील मंत्र्यांना आश्वासनांचा विसर पडला असून जातीजातीत भांडणे लावून मंत्री भ्रष्टाचारात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी. एम. संदीप यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत पदाधिकारी आढाव्यानंतर श्री. संदीप यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ॲड. विजयराव कणसे, बाबुराव शिंदे, बाबासाहेब कदम, भानुदास माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. संदीप म्हणाले, काँग्रेसच्या सत्ताकाळात कधीही कोणावर अन्याय झाला नाही. सर्व जाती धर्माच्या लाेकांना न्याय देण्याचे काम काँग्रेसकडून झाले. मात्र गेल्या काही वर्षात भाजपने आपल्या सत्ताकाळात सुडबुध्दीचे राजकारण सुरु केले आहे. मतदान याद्यांमध्ये घोळ करुन सत्ता मिळवण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याबाबत भांडाफोड केल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. देशात वोट चोर गद्दी चोर चा नारा देत काँग्रेसकडून जोदार अभियान राबवण्यात येत आहे. विरोधी पक्षातील लाेकांवर इडी, इनकम टॅक्स, सीबीआयच्या कारवाया करुन त्यांना त्रास देण्यात आला. विरोधात असला की भ्रष्टाचारी आणि भाजपमध्ये गेला ही चांगला असे सुत्र भाजपने राबवले. त्यामुळे भाजपवाल्यांकडे नक्की कोणती वॉशिंग मशीन आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोर्चबांधणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. सशक्त संघटन करुन आगामी निवडणुका ताकतीने लढल्या जातील. पक्षातील भाजप व आरएसएस प्रेमींना पक्षातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला असून काँग्रेसमध्ये केवळ पदे घेवून जागा अडवून ठेवणे आता खपवून घेतले जाणार नसल्याचे श्री. संदीप यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन भाजपने पाळावे

राज्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात सरकारने पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे होते. मात्र, भाजप या मुद्यावर गप्प आहे. भाजपने मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार कर्जमाफीपासून दूर जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या नावावर सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा या सरकारला विसर पडला आहे. पंतप्रधान विमानतळाच्या उद्घाटनाला महाराष्ट्रात येतात. उदघाटन करुन विमानतळ अदानींच्या घशात घालतात. मात्र राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत एक शब्दही बोलत नाहीत, ही बाब निश्चितच निषेधार्ह असल्याचा आरोपही बी. एम. संदीप यांना केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज कक्ष सुरू; दिवाळीपूर्वी आर्थिक पूर्तीसाठाच्या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
पुढील बातमी
वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत पादचारी ठार

संबंधित बातम्या