सातारा : जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होणार असून जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणाचे आरक्षण पुन्हा पडणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षणही चक्रानुक्रमे न राहता नव्याने पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी ओबीसी महिलांसाठी पडलेले अध्यक्षपदाचे आरक्षणही रद्द होणार आहे. याचबरोबर किती गट राखीव होणार हे निश्चित नसल्याने आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद सदस्यांची मुदत सव्वा तीन वर्षांपूर्वी संपली. त्यामुळे मार्च 2022 पासून जिल्हा परिषदांवर प्रशासक राजवट आहे. पण जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याबाबत आदेश दिला. त्यानंतर जिल्हा परिषद गट रचनेला प्रारंभ झाला. सातारा जिल्ह्यातही गट रचना जाहीर झाली आहे. त्यामुळे एकूण 65 गटांसाठी व पंचायत समितीच्या 130 गणासाठी निवडणूक होणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाला जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचना अहवाल सादर झालेला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे राखीव आणि खुले गट याबाबत सूचना येणार आहेत. त्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. हे आरक्षण मागील निवडणुकींचा विचार न करता नव्याने काढण्यात येणार आहे. चक्रानुक्रमे आरक्षण सोडत होणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. नव्यानेच आरक्षण पडणार असल्याने सर्व गणिते बिघडणार आहे. यापूर्वी अध्यक्षपदासाठी पडलेले ओबीसी महिला आरक्षणही आता रद्द होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहेत. आता अध्यक्षपदासाठी कोणते आरक्षण पडणार? याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छूकांची धाकधूक वाढली असून ही आरक्षण सोडत आता कधी निघणार? याकडे लक्ष लागले आहे.