सातारा : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात लाच घेण्याच्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकरणामुळे माध्यमिक विभागातील कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार आहे. चुकीचे काम करणारे खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची गय करणार नसल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा आज याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, अरुणकुमार दिलपाक, गौरव चक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. या वेळी विषयपत्रिकेवरील व ऐनवेळच्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
माध्यमिक शिक्षण विभागात मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याचे तीव्र पडसाद ठराव समितीच्या सभेत उमटले. याप्रकरणी याशनी नागराजन म्हणाल्या, ‘‘ जिल्हा परिषदेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. सर्व खातेप्रमुखांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
विविध उपक्रम, योजना राबवून जिल्हा परिषदेने आपला नावलौकिक जपला आहे. मात्र, अशा घटनांमुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. खातेप्रमुख कार्यालयात असताना असे प्रकार होत असतील, तर ती गंभीर बाब आहे. माध्यमिक शिक्षण विभागात घडलेल्या घटनेमुळे जिल्हा परिषदेची नाहक बदनामी झाली आहे.’’