सातारा : सातारा शहरालगतच्या क्षेत्र माहुली या गावांमध्ये सर्वे नंबर 12 /1ब जागेतील शून्य हेक्टर 81 आर हे क्षेत्र चर्च ऍट बेथानी ट्रस्ट यांनी शरद पांडुरंग माने यांच्याकडून खरेदी केले होते. मात्र ही जागा एनए नसल्यामुळे येथील आरसीसी बांधकाम अनधिकृत आहे. या इमारतीवर ट्रस्टी पाल जेकब कम यांनी ख्रिश्चन धर्माच्या संदर्भाने मजकूर प्रसिद्ध केला आहे. या इमारतीला प्रार्थना स्थळ म्हणून जाहीर केले आहे. येथील गरजू लोकांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडले जात आहे. या इमारतीमध्ये ख्रिश्चन धर्म प्रसार व प्रचार अशा स्वरूपाचे कार्य केले जाते. ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप माहुली ग्रामस्थांनी करत या इमारतीवर आणि संबंधित ट्रस्टीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना माहुली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन सादर केले. या निवेदनावर नवनाथ हरिश्चंद्र जाधव, चैतन्य जनार्दन पवार, अमोल पांडुरंग पडवळ, समीर दिनकर गायकवाड, मिलिंद आनंदराव चव्हाण, राधेश्याम नथू चौधरी, संतोष दत्तात्रय शेलार, शुभम शिवाजीराव जाधव, किरण प्रकाश ढवळे, मनोज चव्हाण, संजय दत्तात्रय जाधव, चेतन हरीश कुमार पटेल यांच्या स्वाक्षरी आहेत. माहुली ग्रामस्थांनी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला व प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की, ऍट बेथानी ट्रस्ट यांनी खरेदी केलेल्या जमिनीमध्ये खरेदीचा हेतू ग्रीन हाऊस काम करता, असा उल्लेख आहे. असे असताना सुद्धा ट्रस्टच्या वतीने येथे आरसीसी इमारत बांधून त्या इमारतीच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे काम सुरू आहे. सुरुवातीला हे खरेदीपत्र नरोजी पॉल जेकब यांच्या नावे करण्यात आले होते. त्यानंतर खरेदी दुरुस्ती 31 जानेवारी 2014 रोजी करण्यात येऊन ती जागा पॉल जेकब यांच्या नावाने खरेदी मिळकत दाखवण्यात आली. वास्तविक ही जमीन बिनशेती झालेली नसल्यामुळे या जमिनीची खरेदी शेतकर्याने करणे कायद्याने अभिप्रेत आहे आणि त्यांचा ट्रस्ट ही जमीन कशी काय खरेदी करू शकतो, असा सवाल या निवेदनात नमूद आहे. येथील आरसीसी बांधकाम पूर्णपणे अनधिकृत आहे. तसेच मिळकतीच्या झालेल्या पहिल्या व्यवहाराला गुंठेवारी कायद्याची बाधा येते. या कायद्याची पायमल्ली करून या जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीच्या एका भिंतीवर प्रार्थना स्थळ असा उल्लेख करून तेथे ख्रिश्चन धर्माशी संबंधित बोधवचने लिहिण्यात आलेली आहेत. हे प्रार्थना स्थळ उभारणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची कोणतीही परवानगी नाही. या इमारतीवर नमूद केल्याप्रमाणे लिहिलेले वाक्य जाणून-बुजून धर्मवाद निर्माण करण्यासाठी लिहिलेले आहे. या इमारतीच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्म प्रसार व प्रचार स्वरूपाचे कार्य सुरू आहे. येथील गरजू लोकांना प्रलोभने दाखवून जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडले जात आहे. या घटनांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन ही बेकायदेशीर इमारत निष्कासित करावी व संबंधित ट्रस्टींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
क्षेत्र माहुली येथील ऍट बेथानी ट्रस्ट च्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करावी
माहुली ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन
by Team Satara Today | published on : 11 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा