जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी ९७.९२ टक्के मतदानाने राजकीय धुरळा; खंडाळ्यात राडा तर फलटणमध्ये नेत्यांचे ‘राजकीय स्मितहास्य’

by Team Satara Today | published on : 01 November 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विक्रमी ९७.९२ टक्के मतदान झाले असून, वरकरणी एकत्र दिसणाऱ्या महायुतीमधील घटक पक्षांतच अंतर्गत वर्चस्वाची थेट आणि अटीतटीची लढाई पाहायला मिळाली.
जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय सत्ताकारणाची नाडी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी रविवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात एकत्र असले, तरी प्रत्यक्षात मात्र जास्तीत जास्त संचालक निवडून आणत बँकेवर स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती. यामुळे ही निवडणूक केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरती मर्यादित न राहता आगामी काळातील राजकीय समीकरणांची पायाभरणी करणारी ठरली आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक चुरस आणि तणाव खंडाळा तालुका सोसायटी मतदारसंघात अनुभवायला मिळाला. केवळ ५० मतदारांचा सहभाग असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले, भाजपचे अनिरुद्ध गाढवे आणि अपक्ष ॲड. शामराव गाढवे यांच्यात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत रंगली. प्रत्येक मत अत्यंत मोलाचे असल्याने मतदारांची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सकाळी अकराच्या सुमारास मतदारांसह केंद्रावर पोहोचले. त्यानंतर काही वेळातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेदेखील भाजप समर्थित मतदारांचा ताफा घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी उपस्थित गर्दीतून काही घोषणाबाजी झाल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आले. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर पाहता पाहता धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.
दुसऱ्या बाजूला फलटणमध्ये मात्र पूर्णपणे वेगळे आणि आश्चर्यकारक राजकीय दृश्य पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदान केंद्राबाहेर अनपेक्षितपणे समोरासमोर आले. राजकीय संघर्षासाठी ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही मातब्बर नेत्यांनी एकमेकांना पाहून स्मितहास्य करत आदराने हात जोडले. काही दिवसांपूर्वीच कराड येथे एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे एकाच व्यासपीठावर शेजारी बसून दिलखुलास चर्चा करताना दिसले होते. त्यानंतर आता फलटणमधील या दुर्मिळ भेटीने राजकीय वर्तुळात नव्या संभाव्य समीकरणांची आणि पडद्यामागील हालचालींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे थेट निवडणुकीच्या रिंगणात नसले, तरी त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. महायुतीच्या जागावाटपात अधिक जागांचा त्याग करून आपण वरिष्ठ नेतृत्वाला दिलेला शब्द पाळल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी आधीच स्पष्ट केले होते. तरीही दोन्ही राजांच्या समर्थकांची मतदान केंद्र परिसरातील लक्षणीय उपस्थिती आणि पडद्यामागील हालचाली पाहता बँकेच्या आगामी सत्तास्थापनेत त्यांचाच अदृश्य रिमोट कंट्रोल अत्यंत प्रभावी आणि निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत होते.
माण आणि पाटण तालुक्यांमध्येही अंतर्गत राजकीय संघर्ष उफाळून आला होता. माणमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात शेखर गोरे आणि मनोज पोळ यांनी कडवे आव्हान उभे केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पाहायला मिळाला. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील पारंपरिक राजकीय वैर या निवडणुकीतही केंद्रस्थानी राहिले. महाबळेश्वरमध्ये शिवसेना आणि विरोधक यांच्यात चुरस रंगली, तर अनुसूचित जमाती आणि भटक्या प्रवर्गातील राखीव जागांवरही उमेदवारांनी विजयासाठी अतोनात प्रयत्न केले. या सर्व पार्श्वभूमीवर पार पडलेले हे ऐतिहासिक मतदान म्हणजे महायुतीतील अंतर्गत शक्तिपरीक्षेचाच प्रत्यय ठरले असून, ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावरील राजकीय वर्चस्वाचा खरा कौल समोर येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मंगळवार पेठेत तीन वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मोळाचा ओढा परिसरात भीषण अपघात; डंपरचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या