सातारा : राजवाड्यावरून पोवई नाक्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. मात्र, नागरिकांनी तीन जखमींना तातडीने कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. हा अपघात शुक्रवारी रात्री अकरा वाजता झाला.
सागर गाडे, शुभम पवार (दोघेही रा. करंजे पेठ, सातारा), साहील जमादार (बुधवार नाका, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
हे तिघे रात्री कारमधून राजवाड्यावरून पोवई नाक्याकडे निघाले होते. यावेळी साहील जमादार हा कार चालवत होता. महाराजा सयाजीराव शाळेसमोर आल्यानंतर कारचालक साहील याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने नागरिक घटनास्थळी धावले. कारने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी जखमी तरूणांना तातडीने कारमधून बाहेर काढले. त्यानंतर सातारा नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.
पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे कारचेही फारसे नुकसान झाले आहे. जखमी तरूणांना सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.