कराडच्या विजयस्तंभाला बसवले ‘एलईडी कर्ब स्टोन’

कराड : शहरातील विजय दिवस चौकातील ‘अमर जवान’ स्तंभाला नवी झळाळी मिळाली असून, ‘एलईडी कर्ब स्टोन’ हा रंगीबेरंगी स्टोन बसवला आहे. कर्ब या नव्या तंत्राने विजय दिवस चौकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

विशेष म्हणजे पुणे, मुंबईसारख्या मेट्रो सिटीनंतर हा उपक्रम सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच राबवला जात आहे. कराड शहराच्या दृष्टीने विजय दिवस चौकाला विशेष महत्त्व आहे. चौकात उभारलेल्या ‘अमर जवान’ स्तंभाकडे पाहिल्यावर शहिदांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या चौकातील ‘अमर जवान’ स्तंभाचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना क रा डच्या दिवंगत समीर पवार मित्रमंडळाची होती. स्तंभाचे सुशोभीकरण करण्याचा मानस विजय दिवस समारोह समितीचे अरुण जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी बोलून दाखवला. त्यानुसार पवार यांनी कऱ्हाडच्या संभव सर्व्हिसेसचे केतन शहा यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. 

त्यानुसार मुंबई, पुणेच्या धर्तीवर ‘एलईडी कर्ब स्टोन’ बसवण्याचे नियोजन झाले. आधुनिक पद्धतीच्या या कर्ब स्टोनचे प्रात्यक्षिक केतन शहा यांनी माजी नगरसेवक अरुण जाधव, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना दाखवले. त्यांनीही या सुशोभीकरणाचे कौतुक केले. मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड यांचीही परवानगी घेण्यात आली.

विजयस्तंभाला बसविण्यात आलेली आधुनिक एलईडी एवढी मजबूत आहे की ती २०० टनाचा भार सहन करू शकते. दिवसा हे रंगीबेरंगी दिसत असल्याने वाहनधारकांना सहज नजरेस पडणार आहे. सायंकाळनंतर त्यात एलईडी लाइट लागल्यानंतर सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. शिवाय हे बसविल्यानंतर देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही. पावसाळ्यातही हे टिकून राहणार आहे.

मागील बातमी
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
पुढील बातमी
राज्यातील साखर उद्योगाला खुश करण्याचा केंद्राचा : हेमंत पाटील

संबंधित बातम्या