सातारा : महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शालेय शिक्षण सातारा भूमीत झालेले आहे. याच भूमीतून महामानव घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्याचा निर्धार पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी केला आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाजातून उदंड प्रतिसाद लाभत आहे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे ऐतिहासिक शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचे प्रबोधन करताना दिला. आज भारत देशातील परिस्थिती जर पाहिली तर संविधान वाचवण्यासाठी शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, शिक्षणामुळे न्यूनगंड व अंधश्रद्धा दूर फेकली जाते. आज खऱ्या अर्थाने प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत संविधानामय बनवण्याचा निर्धार तरुण पिढी करत आहे. या तरुण पिढीला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये संधी उपलब्ध करून त्यांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी श्री रमेश उबाळे यांनी घेतलेल्या भूमिकेचे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी कौतुक केले आहे.
एवढेच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. कारण, युगपुरुषांच्या जयंतीनिमित्त पारंपारिक वाद्य वगळता वाजणारे डी.जे. डॉल्बी यामुळे समाजाची अधोगती होत आहे. दुसऱ्या बाजूला ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही. समाजामध्ये प्रतिष्ठा नाही. अशा काही मंडळींचे हातात गंडा, डोळ्याला गॉगल, कपाळी टिळा आणि मेंदूमध्ये मनुवादी विचार अशी कम्प्युटरवर मिक्सिंग करून बॅनर वर लावण्यात आलेले फोटो बघून इतर समाज बांधवांना ही किळस वाटते. आता याबाबत आंबेडकरवादी वस्तीतूनच त्याचा उठाव सुरू झालेला आहे.
एका बाजूला निवडणुकीच्या तोंडावर सर्वच जातीयवादी शक्तीचे समर्थन करायचे आणि दुसऱ्या बाजूला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाबाबत बोटचेपी धोरण ठेवायचे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. अशा शब्दात ज्येष्ठ आंबेडकरवाद्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावर उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यातील डॉ. आंबेडकर जयंती निमित्त नो डी.जे. नो डान्स, ओन्ली एज्युकेशन असे स्लोगन घेऊन तरुण पिढी जयंती साजरी करत आहे.
या शैक्षणिक जयंती निमित्त स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच विविध शासकीय कार्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी गरीब, शोषित, कष्टकरी मुलांना मोफत शैक्षणिक पुस्तक वाटप करून शैक्षणिक जयंती करण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवात झाली असून घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या या आंबेडकर जयंतीचे अनुकरण संपूर्ण देशभर करतील. अशा शब्दात बुद्धगया येथील विहाराच्या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या व आंबेडकरी चळवळी सक्रिय असलेल्या श्री संजय गायकवाड व श्री प्रेमानंद जगताप यांनी बिहार बुद्धगया येथून संदेश पाठवला आहे. त्याचीही चर्चा सुरू झालेली आहे.
सध्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व पुस्तिका मोफत वितरित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हीच खरी विधायक आंबेडकर जयंती असल्याचे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी सांगून या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासित केले आहे. यावेळी बाबुराव चव्हाण, नितीन रोकडे, नितीन रोकडे, पलाश गायकवाड, महेश रणदिवे, विशाल भोसले, यदु खंडाईत, जमीर भोसले, चंद्रकांत उबाळे, रवी फणसे, रुपेश उबाळे, भारत जगताप व पुरुषोत्तम कुलकर्णी व मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर जयंती अशा पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार केला आहे.