सातारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कंत्राटी तत्वावरच्या सुमारे 200 हून अधिक आरोग्य सेवकांनी कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सातार्यात हलगी वाजवत मोर्चा काढला. या आंदोलनामध्ये 200 हून अधिक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलकांचे गेल्या पाच दिवसापासून कायमस्वरूपी शासकीय सेवेसाठी जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा विशेषत: ग्रामीण भागातील आरोग्यसेवा पूर्णतः कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांचे या आंदोलनामध्ये प्रचंड हाल होत आहेत. एनआरएचएम च्या कंत्राटी कर्मचार्यांनी गेल्या वर्षभरापासून या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र योजना केंद्र सरकारच्या आखत्यारीतील असल्यामुळे याबाबत निर्णय होताना विलंब होतो आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीने आज आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी सातारा जिल्हा परिषद ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान मोठा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये अडीचशे हुन अधिक आंदोलक सहभागी झाले होते.
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर केले. कर्मचार्यांना नियमित शासन सेवेत समायोजन करून घ्यावे, तसेच या कर्मचार्यांचे बदली धोरण व वेतन वाढ निश्चित करावी, या कर्मचार्यांना आरोग्य अपघात विमा लागू करावा, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हलगी वाजवत जोरदार आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या कर्मचार्यांनी निषेधाचे वेगवेगळे फलक झळकवून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर कर्मचार्यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे एक तास हलगी बजाओ आंदोलन सुरू होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या आंदोलनाची दखल घेत संबंधित कर्मचार्यांचे प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवून याबाबत मार्गदर्शन मागवले जाईल, असे आश्वासन दिले आहे.