पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही : पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा इशारा

तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात ढकलणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; पालकांनाही सतर्कतेचे आवाहन

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : पानटपरीच्या आडून नशेचा बाजार मांडणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे!  अल्पवयीन मुले आणि युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अवैध नशेच्या पदार्थांच्या विक्रीला आता सातारा तालुका पोलिसांकडून चाप लावण्यात येणार आहे.  पानटपऱ्यांमधून अवैध नशेचे पदार्थ विक्री अथवा साठवणूक करताना आढळल्यास संबंधित चालक व मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला.  नशेच्या धंद्यातून पैसा कमावण्यापेक्षा समाजाचे भविष्य जपणे महत्त्वाचे आहे, असा ठाम संदेश पोलिसांनी पानटपरी चालकांच्या बैठकीतून दिला.
नशामुक्त भारत अभियानांतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानटपरी चालक व मालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  शहर व परिसरातील काही पानटपऱ्यांमध्ये बंटा गोळ्या, गुटखा, सिगारेट, गांजाच्या पुड्या, दारू तसेच अन्य नशेचे पदार्थ अवैधरित्या विक्री व साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  अशा पदार्थांची सहज उपलब्धता तरुणांना व्यसनाच्या दलदलीत ओढत असून, याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि सामाजिक वातावरणावर होत आहे.
पानटपरीच्या आड गैरधंदे चालवणाऱ्यांना पोलिसांचा इशारा!
पानटपरी हा व्यवसाय आहे, नशेचा अड्डा नव्हे!  दुकानांमध्ये अवैध नशेचे पदार्थ साठवून ठेवणे, त्यांची विक्री करणे अथवा अल्पवयीन मुलांना व्यसनाधीन करणाऱ्या पदार्थांची उपलब्धता करून देणे खपवून घेतले जाणार नाही.  पानटपऱ्यांमध्ये नशा करून युवकांकडून नागरिकांना त्रास होणे, सामाजिक शांतता भंग होणे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित चालक व मालकांना जबाबदार धरून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या.
चार पैशांच्या हव्यासापोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका!
व्यावसायिकांनी केवळ आर्थिक नफ्याचा विचार न करता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.  आपल्या दुकानातून कोणत्याही प्रकारच्या अवैध नशेच्या पदार्थांची विक्री होणार नाही, गैरप्रकारांना आश्रय मिळणार नाही आणि परिसरातील वातावरण बिघडणार नाही, याची प्रत्येक व्यावसायिकाने खबरदारी घ्यावी.  तरुण पिढीला व्यसनाच्या मार्गावर नेणाऱ्या प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी स्पष्ट केले.
पालकांनीही 'आमचे मूल असे करणार नाही' या गैरसमजात राहू नये!
व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या लढ्यात पालकांची भूमिका निर्णायक आहे.  मुलांच्या मित्रपरिवाराकडे, संगतीकडे, दैनंदिन हालचालींकडे आणि वागणुकीतील बदलांकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.  मुले कुठे जातात, कोणासोबत वेळ घालवतात, अचानक पैसे मागण्याचे प्रमाण वाढले आहे का, त्यांच्या सवयी बदलत आहेत का, याची वेळीच दखल घ्यावी.  मुलांशी संवाद साधून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे.
तरुण पिढी ही देशाची ताकद आहे;  ती नशेच्या विळख्यात अडकली तर कुटुंबासह समाजाचेही नुकसान होते.  त्यामुळे नशेच्या पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे, व्यसनाधीनतेपासून युवकांना दूर ठेवणे आणि व्यसनमुक्त वातावरण निर्माण करणे यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा.  नशेचा धंदा करणाऱ्यांना कायद्याचा धाक आणि तरुणांना व्यसनापासून संरक्षण, हाच सातारा तालुका पोलिसांचा निर्धार असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेली दुक्कल जेरबंद; सातारा स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाण्यांची संयुक्त कारवाई
पुढील बातमी
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे ‘रचना २०२६’ वास्तू प्रदर्शनाचे आयोजन - कौस्तुभ मोरे

संबंधित बातम्या