सातारा : मन सदैव चांगल्या गोष्टी घडविण्यात गुंतवणे आणि स्वहितासह समाजहिताच्या मंगलमय कृती करणे, हेच ज्ञान दीपावलीचे वैशिष्ट्य आहे. फटाक्यांऐवजी वाचन, सर्जनशील उपक्रम आणि सेवाभावी कृतींतून आपुलकी, प्रेम, माणुसकी व जिव्हाळा वाढविणारी ज्ञानदीपावली साजरी करावी, असे आवाहन साहित्यवेल प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे.
फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर, धूळ आणि तीव्र आवाज यांमुळे वायू व ध्वनिप्रदूषण होते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्याचा त्रास होऊ शकतो. पक्षी व प्राणीही मोठ्या आवाजामुळे अस्वस्थ होतात. फटाके हाताळताना भाजणे, डोळ्यांना इजा होणे आणि आग लागणे अशा दुर्घटनांचा धोका असतो. आपल्या आनंदामुळे इतरांना त्रास होऊ नये आणि पर्यावरणाची हानी होऊ नये, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
फटाक्यांवरील खर्चातून चांगली पुस्तके खरेदी करावीत. मुलांनी गोष्टी, कविता, विज्ञान, इतिहास, चरित्रे आणि निसर्गविषयक साहित्य वाचावे. पालकांनी मुलांसोबत वाचन करून वाचलेल्या गोष्टींवर मनमोकळा संवाद साधावा. मित्रांना, आप्तेष्टांना आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके भेट द्यावीत. वाचनातून मिळणाऱ्या ज्ञानाला चिंतनाची आणि प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्यास वैयक्तिक व सामाजिक जीवन समृद्ध होऊ शकते.
सुटीचा कालावधी निर्मितीचा आनंद घेण्यासाठी, निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी, आपुलकी वाढविण्यासाठी आणि मनाला शांती व समाधान देण्यासाठी असावा. मुलांनी किल्ले बनवून त्यांचा इतिहास जाणून घ्यावा. आकाशकंदील, शुभेच्छापत्रे आणि पर्यावरणस्नेही सजावट स्वतः तयार करावी. चित्रकला, रांगोळी, गोष्टी-कविता लेखन, गायन व वादन यांत रमावे. मैदानी खेळ खेळावेत, वयाला अनुरूप चांगले चित्रपट पाहावेत आणि हसतखेळत नवी कौशल्ये शिकावीत. पालकांनीही या उपक्रमांत सहभागी होऊन मुलांच्या कल्पकतेला प्रोत्साहन द्यावे.
ज्ञानदीपावलीनिमित्त आपल्या गावी जाऊन वृद्ध व्यक्ती, बालके, मित्र आणि आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ घालवावा. ज्येष्ठांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांच्या आठवणी ऐकाव्यात; मुलांसोबत खेळावे आणि गोष्टी सांगाव्यात. दुरावलेली नाती संवादाने जोडावीत. भेटीगाठींतून आणि परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होण्यातून नात्यांतील जिव्हाळा वाढविता येतो, असे वाघमारे यांनी नमूद केले आहे.
अभावग्रस्त आणि गरजू व्यक्तींच्या गरजा ओळखून आपल्या ऐपतीप्रमाणे सन्मानपूर्वक मदत करावी. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य द्यावे; अन्न, वस्त्र आणि अन्य आवश्यक गोष्टींसाठी हातभार लावावा. दिव्यांग व्यक्ती, बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती आणि निराधारांच्या गरजांचेही भान ठेवावे. वर्षातून काही वेळा तरी त्यांना भेटावे, आस्थेने संवाद साधावा आणि आवश्यक सहकार्य करावे. आर्थिक मदतीइतकाच आपला वेळ, सहवास आणि भावनिक आधारही मोलाचा ठरू शकतो.
स्वतःचे आरोग्य जपणे, ज्ञान वाढविणे, नाती समृद्ध करणे आणि लोककल्याणासाठी कृती करणे यांची सांगड आपल्या आचरणात घातली पाहिजे. प्रत्येकाने एक चांगले पुस्तक वाचावे, एक सर्जनशील कृती करावी आणि कोणाच्या तरी जीवनात आनंद निर्माण करावा. ज्ञानदीपावलीचा प्रकाश आपल्या विचारांतून व आचरणातून वर्षभर तेवत राहावा, असे आवाहन प्रा. डॉ. वाघमारे यांनी केले आहे.
फटाक्यांऐवजी सर्जनशील ज्ञान दीपावली साजरी करा; साहित्यवेल प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा