दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; वाई-जांभळी रस्त्यावर मेणवली येथील घटना

by Team Satara Today | published on : 30 April 2026


वाई : वाई-जांभळी रस्त्यावर मेणवली येथील एका हॉटेलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली.

सागर एकनाथ पवार (रा. नेवासा, जि. नगर) व नीलेश मारुती येवले अशी ठार झालेल्या दुचाकी चालकांची नावे आहेत. याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सागर पवार हे मुलीला दुचाकीवरून घेऊन पांडेवाडीकडे निघाले होते. तर नीलेश येवले हे पत्नी व मुलीसह वाईवरून निघाले होते. मेणवली येथे एका हॉटेलसमोर दोन्ही दुचाकींची समोरसमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील सर्व जण काही अंतरावर फेकले गेले. यामध्ये सागर आणि नीलेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर सागर यांची मुलगी पूनम व नीलेश यांच्या पत्नी अश्विनी आणि मुलगी परी या जखमी झाल्या आहेत.

येवले यांच्या भाचीचा बुधवारी विवाह सोहळा होणार होता. या लग्नाची सर्व तयारी आणि व्यवस्था नीलेश येवले स्वतः सांभाळत होते. त्यासाठी लागणारी वस्त्रे आणि इतर सर्व महत्त्वाची खरेदी त्यांनी करून ठेवली होती. लग्नाची जय्यत तयारी झाली असतानाच मंगळवारी संध्याकाळी काळाने झडप घातली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड-विटा मार्गावर सुर्ली घाटात ट्रॅव्हल्स पलटी; चालकासह सात जण जखमी; ब्रेक फेल झाल्याने अपघात
पुढील बातमी
सातारा जिल्हा क्रीडाधिकारी तारळकर निलंबित; सोलापूर व सातारा येथील जलतरण तलावातील भ्रष्टाचाराचा ठपका

संबंधित बातम्या