पाटण तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा केला गळा आवळून खून ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

by Team Satara Today | published on : 03 October 2025


पाटण : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील तळीये पश्चिम येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण करुन तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ठाणे पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय 37, मूळ रा. वाटोळे, ता. पाटण, सध्या. रा. विरार, मुंबई) हा पोलिसांच्या ताब्यात असून खून केल्यानंतर संशयिताने युवतीचा मृतदेह वाजेगाव परिसरातील कोयना धरणाच्या किनाऱ्यालगत जमिनीत पुरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.

याप्रकरणी नात्याने काका असलेल्या संशयिताला, ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय 37, मूळगाव वाटोळे-पाटण, सध्या राहणार विरार, मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी उत्खनन करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला असून, पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संशयिताकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये संशयित सुतार याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत दाखल झाली होती. त्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी संशयिताला रेल्वे परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने युवती गरोदर असल्याचे कळल्यावर, प्रकार उघडकीस येईल या भीतीने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्याने मृतदेह रस्त्यालगत नदीकाठी खड्ड्यात पुरल्याचे सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखा, तहसील प्रशासन आणि वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह उत्खनन करून बाहेर काढण्यात आला. नायब तहसीलदार पंडित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश्वर ननावरे, फॉरेन्सिक तज्ज्ञ स्वरूप कुलकर्णी आणि त्यांचे पथक यावेळी उपस्थित होते.

पोलिसांची कारवाई

संशयिताला रितसर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार शिंगाडे, पोलिस हवालदार एस. आर. ओव्हाळ, अजित शिंदे, संतोष गायकवाड, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सनी आवटे, धीरज महाडिक, राजेंद्र नाळे, अजय पवार, सुजित निंबाळकर, अशोक निकम, साहिल निकम यांनी तपासात भाग घेतला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ
पुढील बातमी
साताऱ्यात दोन राज्य विक्रीकर निरीक्षक 20 हजाराची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई

संबंधित बातम्या