लोणंद : नीरा (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दुचाकींवर भगवे झेंडे लावून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषणा देत आलेल्या १० ते १५ जणांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे ग्रामीण आणि सातारा पोलिसांनी आपल्याला त्यांच्या गाडीत सुखरूप पोहोचवल्याचे सांगत प्रा. हाके यांनी संबंधित भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. प्रा. हाके म्हणाले, ‘‘लोणंद व परिसरातील काही नियोजित कार्यक्रमासाठी मी पुणे येथून येत असताना नीरा येथे चहा पिण्यासाठी थांबलो होते. त्यावेळी दुचाकीवरून हातात भगवे झेंडे घेऊन आणि शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आलेल्या १०-१५ जणांनी मला शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्कीही केली.
दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर पुणे व सातारा पोलिसांनी मला सुरक्षितपणे माझ्या वाहनापर्यंत पोहोचवले. माझ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. आम्ही कुणाच्याही ताटातले मागत नाही, आमचा कोणालाही विरोध नाही. फक्त आमचे आरक्षण टिकले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
राज्यात ओबीसी नेते फिरत असताना त्यांना अशा प्रकारच्या झुंडशाहीचा वारंवार सामना करावा लागत आहे. माझी राज्यातील ओबीसी बांधवांना विनंती आहे, की आपले आरक्षण टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सावध झाले पाहिजे.’’ यावेळी नवनाथ शेळके, विकास धायगुडे, नानासाहेब धायगुडे, जयवंत शेळके उपस्थित होते.