पुसेगाव : पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला सोडून घरी परतताना सातारा-पंढरपूर महामार्गावर नेर फाट्याजवळ कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात दांपत्य जागीच ठार झाले, तर त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा गंभीर जखमी झाला.
विजय बबनराव भोसले (वय ५०) आणि समृद्धी विजय भोसले (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव) अशी मृत दांपत्याची नावे आहेत, तर त्यांचा मुलगा वरद विजय भोसले (वय १६) हा अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील सिद्धिमध्ये उपचार सुरू आहेत.
विजय भोसले हे कुटुंबासह रविवारी सकाळी गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेऊन मुलगी गायत्री हिला पुण्यातील कॉलेजमध्ये सोडण्यासाठी गेले होते. मुलगी गायत्री (वय १९) ही पुण्यात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. तिला सोडून विजय भोसले, पत्नी समृद्धी व मुलगा वरद हे तिघे कारने (एमएच ११ डीएन ३५८०) पुसेगावकडे माघारी येत होते.
सोमवारी पहाटे १:३० वाजता नेर फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळ पुसेगाव बाजूकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच २५ एजे ९३३४) आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. यामध्ये भोसले दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी ट्रकचालक समीर बाबू नदाफ (वय २५, रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव) याने पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत विजय भोसले हे येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळात वरिष्ठ क्लार्क म्हणून कार्यरत होते, तर समृद्धी भोसले या गृहिणी होत्या. घराच्या उंबरठ्यावरच काळाने घाला घातल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेमुळे पुसेगावसह परिसर स्तब्ध झाला आहे.