सातारा : सातारा येथे अद्ययावत अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत, ५०० खाटांचे रुग्णालय तसेच त्याअनुषंगाने विविध आवश्यक बांधकामे सुरु आहेत. मेडिकल कॉलेजचे काम दर्जेदार झाले पाहिजे अशी सूचना काम सुरु होण्यापूर्वीच करण्यात आली होती. बांधकाम झालेल्या इमारतींना दर्जेदार प्लास्टर, रंगकाम झालेले नाही. तसेच विध्यार्थी राहत असलेल्या वसतिगृहात जाळ्या- जळमाटे आहेत, स्वच्छता नाही. या बाबी गंभीर आहेत. दर्जाहीन कामे अजिबात चालणार नाहीत. संबंधित ठेकेदार अधिकारी यांनी त्वरित कामात सुधारणा करावी. मेडिकल कॉलेजच्या कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत तडजोड चालणार नाही, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम तसेच रुग्णालयासह अनुषंगिक बांधकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. टप्पा क्र. १ मध्ये झालेल्या कामाची तसेच टप्पा क्र. २ मध्ये सुरु असलेल्या कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉलेजचे डीन डॉ. बी.जे. काळे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, उप अभियंता श्रीपाद जाधव, उप अभियंता अनिकेत देसाई, कनिष्ठ अभियंता सारिका जाधव, पूजा सावंत, अविनाश कारंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी टप्पा क्र. १ मधील मेडिकल कॉलेज इमारत, रुग्णालय इमारत, वर्ग १ ते ४ इमारत, स्वयंपाक गृह व भोजन कक्ष, वसतिगृह इमारत, शवगृह इमारत, संरक्षक भिंत, रस्ते यांचे झालेले काम, टप्पा क्र. २ मधील महाविद्यालय फॉल्स सिलिंग, फर्निचर, पार्टीशन, रुग्णालय इमारत ब्लॉकवर्क, बाह्य प्लास्टर, अंतर्गत प्लास्टर, वॉटरप्रूफिंग, वसतिगृह, ऑडीटोरियम इमारत, अंतर्गत रस्ते, सुधारणा, पार्किंग आदी कामांची पाहणी केली. याप्रसंगी कामांमध्ये काही त्रुटी असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या निदर्शनास आले. यासंदर्भात ना. शिवेंद्रसिंहराजेंनी नाराजी व्यक्त करून सदरचे काम पुन्हा व्यवस्थित करून घेण्याची सूचना केली. वसतिगृहाची साफसफाई, स्वच्छता नियमीतपणे झाली पाहिजे, अशाही सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. सर्व प्रकारची कामे दर्जेदार झाली पाहिजेत याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवावे, अशी सक्त सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.
सैनिक स्कुल येथील कामाचीही पाहणी
ना. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा येथील सैनिक स्कुल शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. मुलांसाठी प्रत्येकी १२० क्षमतेची ३ वसतिगृहे, मुलींसाठी १२० क्षमतेचे १ वसतिगृह, शिक्षकांसाठी ५८ युनिटची कॉलनी, कर्मचाऱ्यांसाठी ५८ युनिट्सची कॉलनी, स्पर्ट्स क्लब, मेस, प्रिन्सिपल बंगलो, हॉर्स रायडींग क्लब, तबेला यासह इतर कामांची पाहणी केली. सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी सर्व कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.