सातारा : पाटण तालुक्यातील दौलतनगर (मरळी) येथे १ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणारा डोंगरी महोत्सव हा आपल्या ग्रामीण संस्कृती, कृषी परंपरा आणि स्थानिक उद्योजकतेचा उत्सव आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करत सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश ना. शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
महोत्सवांतर्गत कृषी, पशुपक्षी तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळा आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण उद्योगांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. यासाठी संबंधित विभागांनी नियोजनबद्ध तयारी करावी.
महोत्सव काळात भजन, बॅण्ड, पोवाडे, लावणी स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, फूड स्टॉल व फनफेअरच्या माध्यमातून नागरिकांना सांस्कृतिक व मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने सर्व सोयी-सुविधांची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. दौलतनगर (मरळी) जवळील कोयना नदी पात्रात नागरिकांसाठी बोटींगची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगी संबंधित विभागांनी तात्काळ द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
नाडे-नवारस्ता मार्गावरील खड्डे बुजविणे, परिसरात रंगरंगोटी करणे, अखंडित वीजपुरवठा राखणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
डोंगरी महोत्सव हा सातारा जिल्ह्याच्या पर्यटन, संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.